Independence Day : लाल किल्ल्याच्या सुरक्षेसाठी 'कंटेनरची भिंत'; 'राष्ट्र प्रथम-सदैव प्रथम' चा संदेशही देणार
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या लाल किल्ल्याच्या सुरक्षेसाठी पहिल्यांदाच शिपिंग कंटेनरच्या भिंती उभ्या करण्यात आल्या आहेत. त्यावर स्वातंत्र्याचा संदेशही रंगवण्यात येत आहे.
नवी दिल्ली : भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने देशामध्ये सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. दिल्लीच्या लाल किल्ल्यावरुन भारतीय पंतप्रधानांचे करण्यात येणारे संबोधन लक्षात घेता सुरक्षेचा उपाय म्हणून लाल किल्ल्याच्या आजूबाजूला शिपिंग कंटेनरच्या इमारती उभारण्यात आल्या आहेत. या कंटेनरच्या इमारतींच्या माध्यमातून 'राष्ट्र प्रथम-सदैव प्रथम' हा संदेश देण्यात येणार असून देशाच्या सांस्कृतीक, वैज्ञानिक आणि राष्ट्राशी संबंधित इतर पेंटिंगही त्यावर दिसून येणार आहेत.
सुरक्षेच्या कारणास्तवर उभारण्यात येणाऱ्या या कंटेनरच्या इमारतींवर महात्मा गांधी, सरदार पटेल, भगत सिंह आणि नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या प्रतिमा दिसणार आहेत. या कंटेनरच्या दुसऱ्या बाजूला तिरंग्याची प्रतिमा रंगवण्यात येणार आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य ड्रोन हल्ला लक्षात घेता या शिपिंग कंटेनरच्या इमारती उभारण्यात आल्या आहेत असं दिल्ली पोलिसांनी सांगितलं. मात्र याला आणखी एक कारण असल्याचं सांगण्यात येतंय. दिल्लीमध्ये नवीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने शेतकरी दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात आंदोलन करण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून लाल किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यांवर शिपिंग कंटेनरच्या भिंती उभारण्यात आल्याचं सांगण्यात येतंय.
मुंबईत कडेकोट बंदोबस्त
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर घातपाताचा धोका लक्षात घेता देशातील महत्वाच्या शहरांमध्ये चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. या स्वातंत्र्य दिनी मुंबईतील कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी, कोणताही घातपात घडू नये म्हणून मुंबई पोलिसांनी काल रात्री पासून 'मिशन ऑलआउट' सुरू केले आहे. या मिशन अंतर्गत मुंबईच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात नाकाबंदी करण्यात आली आहे. छोट्या रस्त्यांवर पेट्रोलिंग देखील मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. मुंबईच्या वेशीतून आत येणाऱ्या प्रत्येक गाडीची तपासणी केली जात आहे. मुंबईचे महत्त्वाचे प्रवेशद्वार असलेल्या आनंदनगर टोल नाक्यावर मुंबई पोलिसांची मोठी नाकाबंदी लावण्यात आली आहे.
संबंधित बातम्या :