Rahul Gandhi on Corona Crisis: कोरोना लढाईसाठी विदेशातून मिळणाऱ्या मदतीवरुन राहुल गांधींचे केंद्राला पाच प्रश्न
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला विदेशातून मिळणाऱ्या मदतीवरुन प्रश्न विचारले आहेत. या मदतीचा फायदा नेमका कुणाला होत आहे? यासह पाच प्रश्न त्यांनी ट्वीट करुन विचारले आहेत.
नवी दिल्ली : देशात वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळं परिस्थिती गंभीर झाली आहे. स्थिती गंभीर असताना भारताला अनेक देशांकडून मदत मिळत आहे. यामध्ये आर्थिक मदतीसह मेडिकलसंबंधी गोष्टी देखील मिळत आहेत. मात्र या मदतीवरुन राजकारण होत असल्याचं समोर येत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्रा सरकारला विदेशांकडून मिळणाऱ्या मदतीवरुन प्रश्न विचारले आहेत. या मदतीचा फायदा कुणाला होत आहे? असा सवाल राहुल गांधींनी विचारला आहे.
राहुल गांधी यांनी आज याबाबत बुधवारी ट्वीट करत पाच प्रश्न केलेत-
1-विदेशातून कोविडसाठी किती मदत भारताला मिळाली?
2- ही मदत कुठे आहे?
3- या मदतीचा फायदा कुणाला होतोय?
4- कशा पद्धतीनं राज्यांमध्ये या मदतीचं वाटप केलं?
5- यामध्ये पारदर्शकता का नाही?
Questions about Covid foreign aid:
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 5, 2021
- What all supplies has India received?
- Where are they?
- Who is benefitting from them?
- How are they allocated to states?
- Why no transparency?
Any answers, GOI?
देशात दररोज कोरोनाच्या मोठ्या प्रमाणात रुग्णांची भर पडत असताना आता यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर आधीही टीका केली होती. देशात कोरोनाची दुसरी लाट हाहाकार माजवत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यावर विजय मिळवल्याचं आधीच श्रेय घेत आहेत असं सांगत ते म्हणाले होते की, भारतातील कोरोना परिस्थितीवरून संपूर्ण जगभरात चिंता व्यक्त केली जात असताना मोदी सरकार मात्र आपली प्रतिमा निर्माण करण्याच्या कामात व्यस्त आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले होते की, "आत्मनिर्भर होण्याचा उद्देश आहे. कोणीही आता आपल्या मदतीला येणार नाही, पंतप्रधान सुद्धा नाहीत. देशातील कोरोनाची स्थिती आता नियंत्रणाबाहेर गेली आहे आणि केंद्र सरकार आता त्याची जबाबदारी राज्यांवर ढकलत आहे. वैज्ञानिकांनी वारंवार सूचना देऊनही सुरुवातील कोरोनाचा धोका ओळखायला मोदी सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे."
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करताना राहुल गांधी म्हणाले होते की, "भारत हा जगातील पहिलाच देश आहे की ज्या देशात विशेषज्ञ आणि तज्ज्ञांच्या मदतीशिवाय, त्यांच्या सल्ल्याशिवाय कोरोना विरोधात लढा लढला जातोय. लोकांचा जीव वाचवण्यासाठी, योग्य नियोजनासाठी आणि सकारात्मक निर्णयासाठी या तज्ज्ञांची मते आणि सूचना या अत्यंत महत्वाच्या असताना भारतात त्याकडे दुर्लक्ष केलं जातंय."