एक्स्प्लोर
भाजप पदाधिकाऱ्याला धमकवल्याप्रकरणी अपक्ष आमदाराला अटक आणि सुटका
आमदार खंवटे यांच्या अटकेमुळे विधानसभेच्या अधिवेशनाचे उरलेले दोन दिवस गाजण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
![भाजप पदाधिकाऱ्याला धमकवल्याप्रकरणी अपक्ष आमदाराला अटक आणि सुटका Independent MLA Rohan Khaunte arrested by Porvorim police भाजप पदाधिकाऱ्याला धमकवल्याप्रकरणी अपक्ष आमदाराला अटक आणि सुटका](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/02/06155825/rohan-khaunte.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
गोवा : भाजपचे पदाधिकारी प्रेमानंद म्हांबरे यांना धमकी दिल्याप्रकरणी पर्वरीचे अपक्ष आमदार रोहन खंवटे यांना रात्री उशीरा पर्वरी पोलिसांनी अटक होती. मात्र पहाटे त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.
सध्या सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार खंवटे यांनी इतर विरोधी पक्षाच्या आमदारांसोबत सरकार विरोधात आघाडी उघडली होती. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रवक्ता असलेल्या म्हांबरे यांनी बुधवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन आमदार खंवटे यांच्यावर अनेक आरोप केले. त्यानंतर विधानसभा संकुलात म्हांबरे आणि खंवटे आमनेसामने आले होते. त्यावेळी खंवटे यांनी आपल्या हाताला पकडून धमकी दिल्याची तक्रार म्हांबरे यांनी सभापती आणि पर्वरी पोलिसात दिली होती.
काल रात्री उशिरा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार खंवटे यांचं मंत्रीपद गेल्यामुळे वैफल्यग्रस्त झाले असून त्यांच्या दादागिरीचा आम्ही निषेध करतो,असे वक्तव्य केले होते. मुख्यमंत्र्यांनी हा विषय गंभीरपणे घ्यावा,अशी मागणी देखील त्यांनी केली होती. त्यानंतर रात्री उशिरा घडलेल्या घडामोडींमध्ये सभापतींच्या परवानगीनंतर पर्वरी पोलिसांनी रात्री उशिरा आमदार खंवटे यांना अटक करून पहाटे त्यांची जामिनावर सुटका केली.
विधानसभा अधिवेशन सुरु असल्याने खंवटे यांना अटक करण्यापूर्वी पोलिसांना सभापतींची परवानगी घ्यावी लागली. आज या घटनेचे विधानसभेत पडसाद उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही. सरकार विरोधात काँग्रेस, मगो,गोवा फॉरवर्ड आणि अपक्ष मिळून 10 आमदारांनी आघाडी उघडली असून अनेक विषयांवर सरकारची कोंडी देखील केली आहे. मंगळवारी विरोधीपक्षनेते दिगंबर कामत यांच्या विरोधात देखील दक्षिण गोवा भाजपने पत्रकार परिषद घेऊन गैरकारभाराचे आरोप केले होते. त्यानंतर बुधवारी उत्तर गोवा भाजपने आमदार खंवटे यांच्यावर आरोप करत त्यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी केली होती.
दरम्यानआज विधानसभेत मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री प्रमोद सावंत अर्थसंकल्प सादर करणार असून सगळ्याचे लक्ष त्याकडे लागून राहिले आहे. आमदार खंवटे यांच्या अटकेमुळे अधिवेशनाचे उरलेले दोन दिवस गाजण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
बातम्या
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)