Assam Flood : आसाममध्ये दरवर्षी 2 हजार गावांना बसतो पुराचा फटका, तर दरवर्षी आठ हजार हेक्टरील जमिनीची होते धूप
दरवर्षी येणाऱ्या पुरामुळं आठ हजार हेक्टरवरील जमिनीचं नुकसान होत असल्याचं एका अहवालात सांगण्यात आलं आहे. तर दरवर्षी किमान 2000 गावांना तरी पुराचा फटका बसत असल्याचं सांगण्यात आलं आहे.
Assam Flood : आसाममध्ये सध्या पुराचा तांडव सुरुच आहे. पुराच्या पाण्यामुळं तेथील जनजीवन विस्कळीत झालं आहे. लाखो लोक बेघर झाले आहेत. आतापर्यंत आसाममधील 35 पैकी 32 जिल्ह्यांतील 5 हजार 577 गावांना फटका बसला आहे. या पुरामुळं सुमारे 55.42 लाख लोक बाधित झाले आहेत. दरम्यान, दरवर्षी येणाऱ्या पुरामुळं आठ हजार हेक्टरवरील जमिनीचं नुकसान होत असल्याचं एका अहवालात सांगण्यात आलं आहे. तर दरवर्षी किमान 2000 गावांना तरी पुराचा फटका बसत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
पुरामुळे 1.20 लाखांहून अधिक घरांचं नुकसान
दरम्यान, आत्तापर्यंत आसाममध्ये पूर आणि भूस्खलनामुळं 117 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर सुमारे 1 लाख 8 हजार 306 हेक्टरील शेतजमीन पुराच्या तडाख्यात सापडली आहे. पुरामुळं 7 हजार 636 जनावरांचाही मृत्यू झाला आहे. पुरामुळे 1.20 लाखांहून अधिक घरांचं पूर्ण किंवा अंशत: नुकसान झालं असल्याची माहिती देण्यात आली आहे. केंद्रीय जल आयोगाच्या अहवालानुसार आसाममधील कोपली नदी रेड अलर्टवर आहे, तर ब्रह्मपुत्रा, बराक, कुशियारा, कटखल नद्या वेगवेगळ्या ठिकाणी धोक्याच्या पातळीच्या वर वाहत आहेत.
अल्पावधीतच भरपूर पाऊस पडतो. त्यामुळं पूरस्थिती
आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अहवालानुसार, आसाममधील जवळपास सर्वच नद्या पुरासाठी ओळखल्या जातात. आसाममध्ये अल्पावधीतच भरपूर पाऊस पडतो. त्यामुळं पूरस्थिती निर्माण होते. परंतु पुरामुळे सर्वाधिक नुकसान ब्रह्मपुत्रा आणि बराक नद्यांचे झाले आहे. या नद्यांमुळे आसाममधील जमिनीचा ऱ्हास झपाट्याने वाढत आहे. आसाममधील ब्रह्मपुत्रा खोऱ्याला पुराच्या दृष्टिकोनातून देशातील प्रमुख धोकादायक क्षेत्र मानले जाते. येथे सुमारे 40 टक्के जमिनीचे (3.2 दशलक्ष हेक्टर) नुकसान झाले आहे.
राष्ट्रीय पूर आयोगाच्या अहवाल
दरम्यान, राष्ट्रीय पूर आयोगाच्या अहवालानुसार, आसाममध्ये एकूण भूभागाच्या 31.05 लाख हेक्टर (39.58%) पूरप्रवण क्षेत्र आहे. जे देशाच्या एकूण पूरप्रवण क्षेत्राच्या 10.2 टक्के आहे. आसाममध्ये 1953 पासून दरवर्षी पूर येतो. दरवर्षी किमान 2000 गावांना तरी पुराचा फटका बसत असल्याचे या अहवालात सांगण्यात आलं आहे. जलसंसाधनावरील संसदीय समितीच्या 2020-21 च्या अहवालात यावर तपशीलवार चर्चा करण्यात आली आहे. राष्ट्रीय पूर आयोगाच्या हवाल्यानं अहवालात म्हटले आहे की, 1954 पासून आसाममध्ये 4 लाख 27 हजार हेक्टर जमिनीची धूप झाली आहे. ही जमिन राज्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे 7 टक्के आहे. दरवर्षी 8,000 हेक्टर जमिनीची धूप होते. गेल्या शतकात ब्रह्मपुत्रा नदीचे क्षेत्रफळ जवळपास दुप्पट झाल्याचेही या अहवालात आश्चर्यकारक आहे. म्हणजेच जमिनीचा मोठा भाग ब्रह्मपुत्रेत गेला आहे.
दरम्यान, संसदीय समितीने केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाला आसाममध्ये येणाऱ्या पुरासाठी काय व्यवस्था करण्यात आली आहे, अशी विचारणा केली होती. मंत्रालयाकडून असे सांगण्यात आले की, पुराच्या समस्येवर दीर्घकालीन तोडगा काढण्यासाठी नद्या आणि त्यांच्या उपनद्यांवर वेगवेगळ्या ठिकाणी साठवणुकीची व्यवस्था करावी लागेल. तसेच ब्रह्मपुत्रेवरील बंधारे खूप जुने असल्याने नवीन बंधारे बांधावे लागणार आहेत. संसदीय समितीनं अरुणाचल प्रदेशातील जल प्रकल्पांमुळे आसाममधील पुराची समस्या वाढली आहे का, असे विचारले असता केंद्रीय मंत्रालयाने उत्तर दिले की हा आसाम आणि अरुणाचल प्रदेश सरकारमधील विषय आहे. तो खूपच गुंतागुंतीचा आहे आणि केंद्र सरकारच भूमिका बजावू शकते. मध्यस्थाची भूमिका. कारण धरणाचीच अडचण असती तर भाक्रा किंवा दामोदरसारखी धरणे बांधलीच नसती.