(Source: ECI/ABP News/ABP Majha)
देशातील बहुतांश भागात सहा ते आठ आठवड्यांचा लॉकडाऊन लावण्यात यावा; ICMR चे प्रमुख डॉ. बलराम भार्गव यांचा सल्ला
देशातील 718 जिल्ह्यांपैकी दोन तृतीयांश जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या संक्रमणाचा दर हा 10 टक्क्यांहून जास्त आहे. या ठिकाणी सहा ते आठ आठवड्यांचा लॉकडाऊन लावण्याची गरज असल्याचं डॉ. बलराम भार्गव (Dr.Balram Bhargava) यांनी सांगितलं आहे.
नवी दिल्ली : देशातील ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना संक्रमणाचा दर हा 10 टक्क्याहून जास्त आहे त्या जिल्ह्यांमध्ये सहा ते आठ आठवड्यांचा लॉकडाऊन लावण्याची गरज असल्याचं मत इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च अर्थात आयसीएमआरचे प्रमुख डॉ. बलराम भार्गव यांनी व्यक्त केलंय. सध्याच्या परिस्थितीत भारतातील 718 जिल्ह्यांपैकी दोन तृतीयांश जिल्ह्यांमध्ये कोरोना संक्रमणाचा दर हा 10 टक्क्यांहून जास्त आहे अशी माहितीही त्यांनी दिली.
डॉ. बलराम भार्गव मंगळवारी एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना म्हणाले की, देशातील कोरोनाच्या नवीन म्युटेंटमुळे तरुणांमध्ये कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे. तसेच तरुण लोक हे मोठ्या प्रमाणावर प्रवास करत असल्यानेही त्यांना जास्त प्रमाणात कोरोनाची लागण होत आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये जास्त काही अंतर नाही. या दुसऱ्या लाटेतही 40 वर्षावरील लोकांनाही आरोग्याच्या समस्यांमुळे कोरोनाची लागण मोठ्या प्रमाणावर होत आहे. सध्या या लोकसंख्येलाच कोरोनाचा सर्वाधिक धोका आहे.
देशात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते आणि त्याचा फटका बालकांना बसू शकतो अशा प्रकारची मतं अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केली आहेत. या वयोगटातील बालकांच्या कोरोना लसीकरणाबद्दल विचारलेल्या एका प्रश्नावर बोलताना डॉ. बलराम भार्गव म्हणाले की, पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचे संक्रमण झालेल्या वयोगटात जास्त अंतर नाही. त्यामुळे तिसरी लाट ही बालकांसाठी जास्त धोकादायक आहे असं मत आताच व्यक्त करणं म्हणजे घाईचं ठरेल.
गेल्या माहिन्यात कोविड टास्क फोर्सच्या झालेल्या बैठकीत डॉ.बलराम भार्गव यांनी देशात लॉकडाऊन लावण्याचा प्रस्ताव ठेवला होता. नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला संबोधित करताना सांगितलं होतं की, राज्यांनी मायक्रो कन्टेन्मेन्ट झोनवर लक्ष केंद्रीत करावं आणि लॉकडाऊनचा पर्याय हा शेवटचा असावा.
कोरोना महामारी संपली असा चुकीचा समज तयार करुन भारताने वेळेआधीच लॉकडाऊन काढल्याने सध्या देश गंभीर संकटात अडकल्याचे अमेरिकेचे वरीष्ठ संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉ. अँथोनी फौची यांनी सांगितले. कोरोना संसर्गाच्या दुसर्या लाटेचा जबरदस्त तडाखा भारताला बसला आहे. अनेक राज्यात रुग्णालये, आरोग्य कर्मचारी, लस, ऑक्सिजन, औषधे आणि बेड्सच्या तुटवड्यामुळे आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली आहे. त्यामुळे भारतात काही आठवड्यांच्या लॉकडाऊनची गरज असल्याचं मत डॉ. अॅन्थनी फाऊची यांनीही व्यक्त केलं होतं.
गेल्या काही दिवसांत देशातील कोरोना रुग्णसंख्येने चार लाखांचा टप्पा गाठला होता. आता त्याचा आलेख उतरताना दिसत आहे. भारतात सर्वाधिक रुग्णसंख्या ही महाराष्ट्रात आढळते.
महत्वाच्या बातम्या :
- अकरावी CET प्रवेश परीक्षा आणि अंतर्गत मूल्यमापनाचा अंतिम निर्णय लवकरच; शिक्षण विभागाचा सर्वेक्षण अहवाल शासनाला सुपूर्द
- एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक यांना मॅट कोर्टाचा दिलासा; गोंदियात झालेल्या बदलीवर कोर्टाची स्थगिती
- Opposition Letter to PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींना विरोधी पक्षातील नेत्यांच पत्र, आठ महत्वाच्या मागण्या