(Source: ECI/ABP News/ABP Majha)
घरबसल्या कोरोना चाचणी करता येणार, ICMR कडून होम बेस्ड कोविड टेस्टिंग किटला मंजुरी
तुम्ही आता घरबसल्या कोरोनाची चाचणी करु शकता. आयसीएमआरने कोविड चाचणीसाठी होम बेस्ड टेस्टिंग किटला मंजुरी दिल्यानंतर आता चाचणी करणं अतिशय सोपं होणार आहे.
नवी दिल्ली : आता तुम्ही घरबसल्या कोविड-19 चाचणी करु शकता. आयसीएमआरने कोविड-19 च्या चाचणीसाठी होम बेस्ड टेस्टिंग किटला मंजुरी दिली आहे. हे एक होम रॅपिड अँटिजेन टेस्टिंग किट आहे. याचा वापर कोरोनाची सौम्य लक्षणे असलेले किंवा बाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेले लोक करु शकतात. या रॅपिड अँटिजेन टेस्टसाठी नाकातून स्बॅव घ्यावा लागणार आहे. महत्त्वाचं म्हणजे घरात केलेल्या चाचणीचा अहवाल अॅपच्या माध्यमातून आयसीएमआरपर्यंत पोहोचेल आणि तिथे तो गोपनीय ठेवला जाईल.
आयसीएमआरने कोविड चाचणीसाठी होम बेस्ड टेस्टिंग किटला मंजुरी दिल्यानंतर आता चाचणी करणं अतिशय सोपं होणार आहे. भारतात सध्या केवळ एकाच कंपनीला यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मायलॅब डिस्कव्हरी सॉल्युशन लिमिटेड (Mylab Discovery Solutions Ltd) असं या कंपनीचं नाव आहे.
होम टेस्टिंग मोबाईल अॅप गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल स्टोअरवर उपलब्ध आहे. या अॅपचं नाव Mylab Coviself आहे. होम टेस्टिंग करणाऱ्या सर्व युझर्सना हे अॅप डाऊनलोड करावं लागेल. या मोबाईल अॅपमध्ये टेस्टिंगची संपूर्ण प्रक्रिया योग्य प्रकारे समजावण्यात आली आहे. हे अॅप पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह निष्कर्ष देतं. अॅप डाऊनलोड करुन नोंदणी केलेल्या मोबाईलमध्येच सर्व युझर्सना चाचणी पूर्ण झाल्यानंतर टेस्ट स्ट्रिपचा फोटो घ्यायचा आहे. या अॅपमध्ये असलेला डेटा सुरक्षित सर्व्हरवर जमा केला जाईल, जो आयसीएमआर कोविड-19 च्या टेस्टिंग पोर्टलशी कनेक्टेड असेल.
सध्या कोविड-19 चाचणीसाठी अँटिजेन आणि आरटीपीसीआर चाचणी केली जाते. अँटिजेन चाचणीचा अहवाल तातडीने मिळतो, तर आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल 24 तासात येतो. आता कोरोना चाचणीसाठी होम बेस्ड टेस्टिंग किटला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे चाचणीला वेग येईल आणि लोक घरबसल्याच कोरोनाची चाचणी करु शकतात.
𝐈𝐂𝐌𝐑 𝐢𝐬𝐬𝐮𝐞𝐝 𝐀𝐝𝐯𝐢𝐬𝐨𝐫𝐲 𝐟𝐨𝐫 𝐂𝐎𝐕𝐈𝐃-𝟏𝟗 𝐇𝐨𝐦𝐞 𝐓𝐞𝐬𝐭𝐢𝐧𝐠 𝐮𝐬𝐢𝐧𝐠 𝐑𝐚𝐩𝐢𝐝 𝐀𝐧𝐭𝐢𝐠𝐞𝐧 𝐓𝐞𝐬𝐭𝐬 (𝐑𝐀𝐓𝐬). For more details visit https://t.co/dI1pqvXAsZ @PMOIndia #ICMRFIGHTSCOVID19 #IndiaFightsCOVID19 pic.twitter.com/membV3hPbX
— ICMR (@ICMRDELHI) May 19, 2021
यासाठी काही नियमावली जारी करण्यात आली आहे.
- या रॅपिड अँटिजेन टेस्टची होम टेस्टिंग केवळ कोरोनाची सौम्य लक्षणे असलेले किंवा बाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेले लोकच करु शकतात.
- अशाप्रकारची चाचणी जास्त करु नये असा सल्ला आयसीएमआरने दिला आहे
- टेस्ट किटमध्ये दिलेल्या युझर्सनी मॅन्युअलनुसार घरातच चाचणी करावी.
- चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या सर्व व्यक्तींना सल्ला देण्यात आला आहे की, त्यांनी आयसीएमआर आणि आरोग्य मंत्रालयाच्या होम आयसोलेशनच्या नियमांचं पालन करावं.
- या रॅपिड अँटिजेन रिपोर्टमध्ये निगेटिव्ह आलेल्या परंतु कोरोनाची लक्षणे असलेल्या व्यक्तींनी तातडीने आरटीपीसीआर चाचणी करावी. कारण रॅपिड अँटिजेनमध्ये कमी व्हायरल लोडमुळे असा अहवाल येऊ शकतो.
BLOG | पोटात बाळ घेऊन लढणारी आधुनिक झाशीची राणी
- रॅपिड अँटिजेन चाचणीत निगेटिव्ह आलेल्या आणि लक्षणे असलेल्या सर्व व्यक्तींना कोरोना संशयित समजलं जाईल. जोपर्यंत त्यांच्या आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल येत नाही तोपर्यंत त्यांना आयसीएमआर आणि आरोग्य मंत्रालयाच्या होम आयसोलेशन प्रोटोकॉलचं पालन करावं लागेल
दरम्यान आयसीएमआरशिवाय डीसीजीआयनेही होम बेस्ड टेस्टिंग किटच्या बाजारातील विक्रीला मंजुरी दिली आहे. परंतु हे टेस्टिंग किट तातडीने बाजारात उपलब्ध होणार नाही. हे किट मोठ्या प्रमाणात बाजारात उपलब्ध होण्यासाठी काही काळ लागेल.