पत्नीला दाढी असल्याने घटस्फोटाची मागणी, कोर्ट म्हणतं...
पत्नीला दाढी असल्याने आणि तिचा आवाज पुरुषांप्रमाणे असल्याने पतीने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी याचिका दाखल केली. मात्र घटस्फोटाची मागणी करणाऱ्या पतीची याचिका न्यायालयानं फेटाळली आहे.
अहमदाबाद : पत्नीला दाढी असल्याने आणि तिचा आवाज पुरुषांप्रमाणे असल्याने पतीने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी याचिका दाखल केली. मात्र घटस्फोटाची मागणी करणाऱ्या पतीची याचिका न्यायालयानं फेटाळली आहे. सासरच्या मंडळींनी आपल्याला फसवल्याचा दावा याचिकाकर्त्या पतीनं केला आहे. सासरच्यांनी मुलीच्या चेहऱ्यावर केस आणि आवाज पुरुषांसारखा असल्याची माहिती दिली नसल्याचा आरोप करत पतीनं न्यायालयात धाव घेतली.
मुलीला पाहायला गेलो त्यावेळी तिने बुरखा घातला होता. त्यामुळे मला तिचा चेहरा पाहता आला नाही. मुलीच्या कुटुंबीयांनी याबाबतची माहिती मला द्यायला हवी होती, असं पतीनं आपल्या याचिकेत म्हटलं आहे.
पतीच्या याचिकेला उत्तर देतान पत्नीनं म्हटलं की, 'हार्मोन्ससंबंधीच्या कारणामुळे माझ्या चेहऱ्यावर काही केस आहेत आणि वैद्यकीय उपचारानंतर ते हटवले जाऊ शकतात. मात्र चुकीचे आरोप करून मला घराबाहेर काढण्याचा पतीचा डाव आहे.'
घटस्फोटासाठी पतीने दिलेलं कारण पुरेसं नाही. तसेच हुंड्यासाठी महिलेचा सासरच्यांकडून छळ होत असल्याचं महिलेच्या वकिलाने म्हटलं आहे. दोन्ही पक्षांकडील बाजू ऐकूण घेतल्यांतर न्यायालयाने पतीच्या घटस्फोटाची याचिका फेटाळली असून, अशा कारणावरून घटस्फोट दिला जाऊ शकत नाही असंही न्यायालयाने स्पष्ट केलं.