लॉकडाऊन काळातही मुकेश अंबानींच्या संपत्तीत वाढ, दर तासाला कमावत आहेत 90 कोटी रुपये
हुरुन इंडिया रिच लिस्ट 2020 मध्ये रिलायन्स इंडस्ट्रिजचे मुकेश अंबानी सलग नवव्यांदा अव्वल स्थानी आहेत. 6,58,400 कोटी संपत्तीसह ते देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.
मुंबई : कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला. या लॉकडाऊन काळाना अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. उद्योग, व्यवसाय यामध्ये अनेकांना मोठं नुकसान सहन करावं लागलं. मात्र या लॉकडाऊनच्या कठीण काळातही देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणजेच मुकेश अंबानी दर तासाला जवळपास 90 कोटी रुपये कमवत आहेत. हुरुन इंडिया आणि आयआयएफएल वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेडने जारी केलेल्या रिपोर्टमध्ये ही माहिती समोर आली आहे.
हुरुन इंडिया रिच लिस्ट 2020 मध्ये रिलायन्स इंडस्ट्रिजचे मुकेश अंबानी सलग नवव्यांदा अव्वल स्थानी आहेत. 6,58,400 कोटी संपत्तीसह ते देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. तसेच जगभरातील टॉप श्रीमंतांमध्ये मुकेश अंबानी यांचा समावेश आहे. हुरुन इंडिया रिच लिस्ट मध्ये देशातील असा श्रीमंत व्यक्तींचा समावेश आहे, ज्यांची संपत्ती 31 ऑगस्ट 2020 पर्यंत 1000 कोटींहून अधिक आहे. यावर्षी या यादीत 828 भारतीयांनी जागा मिळवली आहे.
लंडनमधील हिंदूजा ब्रदर्स या यादीत 1,43,700 कोटींच्या संपत्तीसह दुसऱ्या स्थानावर आहेत. तर एचसीएलचे संस्थापक शिव नाडर 1,41,700 कोटींसह तिसऱ्या स्थानावर आहेत. तर गौतम अदानी चौथ्या तर विप्रोचे अजीम प्रेमची पाचव्या स्थानावर आहेत.
हुरुन इंडिया रिच लिस्ट 2020 नुसार भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत मुकेश अंबानी यांनी लॉकडाऊन काळातही दर तासाला 90 कोटींची कमाई केली आहे. गेल्या नऊ वर्षात मुकेश अंबानी यांची संपत्ती 2,77,700 कोटींनी वाढून 6,58,400 कोटी झाली आहे.