रेमल चक्रीवादळाचं नवं संकट! चक्रीवादळाचं नाव कसं ठरवलं जातं, माहितीय?
Remal Cyclone Update : चक्रीवादळाचं नाव कसं ठरवलं जातं? हे तुम्हाला माहित आहे का? नसेल तर याबाबत सविस्तर माहिती वाचा.
मुंबई : बंगालच्या उपसागरात तयार झालेलं रेमल चक्रीवादळ काही वेळातच किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. यामुळे पश्चिम बंगाल, उत्तर ओडिशा, मिझोराम, त्रिपुरा आणि दक्षिण मणिपूरमध्ये अलर्ट देण्यात आला आहे. किनारपट्टी भागात एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. काही भागातून नागरिकांचं स्थलांतर करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरु आहे. याआधी दक्षिण भारतात मिचॉन्ग चक्रीवादळाचा कहर पाहायला मिळाला होता. दरम्यान, चक्रीवादळाचं नावं कसं ठरवलं जातं, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर त्याचं उत्तर जाणून घ्या.
चक्रीवादळाची नावं कशी ठरवली जातात?
पूर्वीच्या काळी चक्रीवादळाचं नामकरण करण्याची पद्धत नव्हती. सुरुवातील चक्रीवादळ तारखेनुसार, ओळखले जायचे. पण, पुढे तारखांनुसार, चक्रीवादळाची माहिती लक्षात ठेवणं कठीण होत गेलं. याशिवाय एकाच वेळी वेगवेगळ्या भागात चक्रीवादळ सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची किंवा चक्रीवादळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हवामानतज्ज्ञांनी गंमत म्हणून वादळांना नावे देण्यास सुरुवात
सर्वात आधी ऑस्ट्रेलियातील हवामानतज्ज्ञांनी गंमत म्हणून वादळांना नावे देण्यास सुरुवात केली. ऑस्ट्रेलियातील हवामानतज्ज्ञांनी गंमत म्हणून एक्स गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किंवा आवडत्या-नावडत्या व्यक्तीची नावे चक्रीवादळांना देण्यास सुरुवात केली. 1979 मध्ये जागतिक हवामान संघटनेने चक्रीवादळांना स्त्री-पुरुषांची नावे देण्यास सुरुवात केली. मात्र, चक्रीवादळ एक नैसर्गिक संकट असल्यामुळे याला स्त्री-पुरुषांची नावे देण्यास विरोध झाला. त्यानंतर 2000 मध्ये जागतिक हवामान संघटनेने एक नियमावली तयार करत चक्रीवादळांना निसर्ग, खाद्यपदार्थ किंवा वस्तूशी संबंधित नावे देण्यास सुरुवात केली.
चक्रीवादळांचं नाव ठरवतानाची मार्गदर्शक तत्वे
भारतीय हवामान विभागाच्या नियमावलीनुसार, चक्रीवादळाला नाव देताना यामध्ये लिंग, धर्म, संस्कृती, राजकारण यांच्याशी संबंधित शब्दांचा वापर करणं टाळलं जातं. ज्यामुळे कुणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत. चक्रीवादळांचं नाव ठरवताना काही मार्गदर्शक तत्वे पाळली जातात. यामध्ये कोणत्याही संवेदनशील नावांची निवड केली जात नाही. लिंगभेदी आणि धार्मिक तेढ निर्माण करणारी नावं, याशिवाय राजकीय नेते, ऐतिहासिक व्यक्ती यांची नावंही टाळली जातात.
चक्रीवादळाच्या नामकरणासाठी राष्ट्रांचा एक गट
चक्रीवादळाच्या नावांसाठी दक्षिण आशियायी राष्ट्रांचा एक गट तयार करण्यात आला आहे. यामध्ये भारत, पाकिस्तान, म्यानमार, ओमान, श्रीलंका आणि थायलंड या देशांचा समावेश आहे. याशिवाय, इराण, कतार, सौदी अरेबिया, युएई आणि येमेन या देशांना 2018 मध्ये या यादीत सामील करण्यात आलं. या देशांकडून वादळांच्या नावांचे पर्याय मागवून, या नावांची एक यादी तयार केली जाते.
जगातील चक्रीवादळाच्या नामकरणाची जबाबदारी रिजनल स्पेशलाईडज्ड मेट्रोलॉजिकल सेंटर्स आणि ट्रॉपिकल सायक्लोन वार्मिंग सेंटर्स यांची आहे. अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर आणि हिंद महासागरात तयार होणाऱ्या चक्रीवादळांच्या नामकरणाची जबाबदारी भारतीय हवामान विभागाची आहे.