Honey Adulteration | देशातील प्रमुख ब्रॅण्डच्या मधात भेसळ, CES चा अहवाल
देशातील मधाचे प्रमुख ब्रॅण्ड शुद्धतेच्या चाचणीत नापास झाले आहेत. मधाऐवजी साखरेचा पाक वापरला जात असल्याचं CES ने आपल्या अहवालात म्हटलं आहे.
नवी दिल्ली : मधाला अमृततुल्य समजलं जातं. याचा औषधी गुणधर्म आहे. परंतु यामध्ये भेसळ केली जात असल्याचं समोर आहे. महत्त्वाचं म्हणजे ब्रॅण्डेड कंपन्यांच्या मधात भेसळ होत असल्याचं सेंटर फॉर सायन्स अॅण्ड एन्वायरन्मेंटने म्हटलं आहे. सीएसईच्या महासंचालक सुनीता नारायण यांनी याबाबतची माहिती दिली. भारतीय बाजारात विक्री होत असलेल्या मधाच्या जवळपास सर्वच ब्रॅण्डमध्ये सारखेचा पाक वापरला जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. मधात शुगर सिरपची भेसळ हा खाद्य घोटाळा असल्याचं सुनीता नारायण म्हणाल्या. दरम्यान याच संस्थेने 2003 ते 2006 दरम्यान सॉफ्ट ड्रिंगमध्ये कीटकनाशके असल्याचं म्हटलं होतं.
सध्या भारतीयांकडून मधाचं सेवन अधिक कोविड-19 च्या महामारीत भारतीय सध्य मधाचं जास्तच सेवन करत आहेत. कोरोनाव्हायरसशी लढण्यासाठी मध फायदेशीर असल्याचा त्यांचा विश्वास आहे. मधात अँटीमायक्रोबियल आणि अँटी इन्फेमेटरी गुणांसह रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याची क्षमता आहे. पण सध्या सेवन करत असलेल्या बऱ्याच कंपन्यांचं मध भेसळयुक्त असल्याचं सीएसईच्या चाचणीत निष्पन्न झालं आहे. म्हणजेच मधाच्या रुपात साखर खाल्ली जात आहे. परिणामी लठ्ठपणा आणि इतर व्याधी वाढत आहेत.
परीक्षणातून काय समोर आलं? सीएसईच्या खाद्य संशोधकांनी भारतीय बाजारात विक्री होणाऱ्या 13 प्रसिद्ध मोठ्या आणि छोट्या ब्रॅण्डच्या प्रोसेस्ड मधाची निवड केली. या ब्रॅण्डच्या नमुन्यांचं सर्वात आधी गुजरातच्या राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डमधील (NDDB) सेंटर फॉर अॅनालिसिस अॅण्ड लर्निंग इन लाईवस्टॉक अॅण्ड फूड (CALF) मध्ये परीक्षण करण्यात आलं. जवळपास सर्व मोठे ब्रॅण्ड (एपिस हिमालय वगळता) शुद्धतेच्या परीक्षणात पास झाले. तर काही छोटे ब्रॅण्ड यात फेल झाले. त्यामध्ये सी3 आणि सी4 शुगर सापडली. ही साखर तांदूळ आणि ऊसाची आहे. पण या ब्रॅण्डचे न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेजोनन्समध्ये (NMR) परीक्षण केलं असता जवळपास सगळ्याच ब्रॅण्डचे नमुने फेल झाले. एनएमआर परीक्षणाचा वापर जागतिक स्तरावर मॉडिफाय शुगर सिरपच्या तपासणीसाठी केला जातो. 13 ब्रॅण्डच्या परीक्षणांमध्ये केवळ तीन ब्रॅण्ड एनएमआर परीक्षणात पास झाले. या नमुन्यांची जर्मनीच्या विशेष प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली.
प्रसिद्ध ब्रॅण्ड फेल मधाच्या 77 टक्के नमुन्यांमध्ये शुगर सिरपसह अन्य भेसळही सापडले आहेत. परीक्षण केलेल्या एकूण 22 नमुन्यांमध्ये केवळ पाचही नमुने सर्व परीक्षणांमध्ये पास झाले आहेत. मधाचे प्रमुख ब्रॅण्ड सर्व एनएमआर चाचणीत फेल झाले आहेत. 13 ब्रॅण्ड्समध्ये सफोला, मार्कफेड सोहना आणि नेचर्स नेक्टर हे तीनच ब्रॅण्ड सर्व परीक्षणांमध्ये पास झाले आहेत. महत्त्वाचं म्हणजे भारतामधून निर्यात केल्या जाणाऱ्या मधाचं एनएमआर परीक्षण 1 ऑगस्ट, 2020 पासून अनिवार्य करण्यात आलं आहे. त्यावरुन भारत सरकारला या भेसळीच्या व्यापाराबद्दल माहिती होती, त्यामुळेच त्यांना अत्याधुनिक परीक्षणांची आवश्यकता आहे.
दरम्यान, डाबर आणि पतंजलीने सीएसीईच्या या अहवालाचा इन्कार केला आहे. कंपनीची प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने हे दावे केले जात असल्याचं डाबर आणि पतंजलीचं म्हणणं आहे. सोबतच आमच्या कंपन्यांकडून विकलं जाणारं मध पूर्णत: शुद्ध आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारच्या साखरेची भेसळ केली जात नाही, असा दावाही दोन्ही कंपन्यांनी केला आहे.
Honey Adulteration | पतंजली, डाबरसह प्रसिद्ध कंपन्यांच्या मधात भेसळ, साखर असल्याचं निष्पन्न : CSE