(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Madhya Pradesh High Court: महिलेला लग्नाचं आमिष खरं की खोटं शोधण्यासाठी वर्षापेक्षा जास्त कालावधी पुरेसा; हायकोर्टाकडून पुरुषावरील बलात्काराचा खटला रद्द
सुजाण महिलेसाठी लग्नाचं दिलेलं वचन खरं की खोटं शोधण्यासाठी एक वर्षापेक्षा जास्त वेळ पुरेसा असल्याचे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले. याचिकाकर्त्याविरुद्ध एफआयआर आणि फौजदारी कारवाई रद्द करण्यात आली आहे.
Madhya Pradesh High Court: कोणत्याही सुजाण महिलेला एखाद्या पुरुषाकडून लग्नाचं आमिष दाखवण्यात आलं असल्यास ते खरं आहे की खोटं आहे हे समजण्यास वर्षभराचा पुरेसा कालावधी असल्याचे सांगत मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या ग्वाल्हेर खंडपीठाने पुरुषावरील बलात्काराचा खटला रद्दबातल करत निकाली काढला आहे. एका महिलेनं केलेल्या बलात्काराच्या आरोपानंतर दाखल केलेल्या खटल्यात खंडपीठाने हा महत्वपूर्ण निर्वाळा दिला.
वर्षापेक्षा जास्त कालावधी पुरेसा
मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या ग्वाल्हेर खंडपीठाने लग्नाच्या बहाण्याने एका महिलवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या एका पुरुषाविरुद्धची फौजदारी कारवाई रद्द केली आहे. कोणत्याही सुजाण महिलेसाठी लग्नाचं दिलेलं वचन खरं की खोटं शोधण्यासाठी एक वर्षापेक्षा जास्त वेळ पुरेसा असल्याचे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले. याचिकाकर्त्याविरुद्ध एफआयआर आणि फौजदारी कारवाई रद्द करण्यात आली आहे.
न्यायमूर्ती दीपक कुमार अग्रवाल यांनी 13 जुलै रोजी एका पुरुषाच्या याचिकेवर सुनावणी करताना हे निरीक्षण नोंदवले. मध्य प्रदेशातील दतिया जिल्ह्यातील सिओंधामध्ये एका पुरुषाने त्याच्यावर दाखल झालेला बलात्काराचा गुन्हा रद्द करण्यात यावा यासाठी याचिका दाखल केली होती. लग्नाचं आमिष अगदी सुरुवातीपासूनच खोटं आहे की खरं होतं हे समजण्यासाठी वर्षापेक्षा जास्त कालावधी पुरेसा असल्याचे न्यायालयाने नमूद केले.
स्वेच्छेने याचिकाकर्त्याशी शारीरिक संबंध ठेवले
या आदेशात म्हटले आहे की, फिर्यादी (महिला) याचिकाकर्त्याशी एका महत्त्वाच्या टप्प्यावर संबंधांमध्ये होती. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने तिची संमती मिळवता आली नसती. तक्रारदार फिर्यादी ही एक प्रौढ महिला असून तिला तीन मुले आहेत आणि ती याचिकाकर्त्याला गेल्या एक वर्षाहून अधिक काळ ओळखत होती. तिने स्वत:च्या संमतीने आणि स्वेच्छेने याचिकाकर्त्याशी शारीरिक संबंध ठेवले, असेही आदेशात म्हटले आहे.
...तर असे म्हणता येणार नाही
महिलेने म्हटले होते की ती याचिकाकर्त्यासोबत 2020 पासून रिलेशनशिपमध्ये आहे. जर एखादी महिला दीर्घकाळापर्यंत शारीरिक संबंधात राहिली ज्या दरम्यान ती प्रत्येक ठिकाणी जाण्यास मोकळी होती, तर असे म्हणता येणार नाही. तिची संमती चुकीच्या समजुतीने मिळवली गेली, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. महिला स्वत: आरोपीच्या (या प्रकरणातील याचिकाकर्ता) घरी गेली. त्यामुळे, तिची संमती वस्तुस्थितीच्या चुकीच्या समजुतीने मिळवली गेली असे म्हणता येणार नाही, असेही म्हटले आहे.
जुलै 2021 मध्ये दाखल केलेल्या तक्रारीनुसार, महिलेने सांगितले की ती याचिकाकर्त्याच्या 2017 मध्ये संपर्कात होती. 2020 मध्ये, याचिकाकर्त्याने तिच्याशी लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला आणि त्यानंतर ती 29 जून 2020 रोजी सिओंधा येथे आली आणि तेथे एका घरात राहिली. ज्या ठिकाणी याचिकाकर्त्याने लग्नाच्या बहाण्याने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले, असा आरोप केला होता. महिलेने याचिकाकर्त्याला लग्नाची विचारणा केल्यानंतर दुर्लक्ष केल्याचे म्हटले होते. जुलै 2021 मध्ये पुन्हा सिओंधामध्ये आल्यानंतर बलात्कार केल्याचा आरोप महिलेनं केला होता. तिच्या तक्रारीवरून, याचिकाकर्त्याविरुद्ध बलात्कार आणि धमकावल्याबद्दल एफआयआर नोंदवण्यात आला होता.