(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus : नियमांचं पालन करता येत नसेल तर भारत जोडो यात्रा थांबवावी, आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांचं राहुल गांधींना पत्र
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी राहुल गांधी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना पत्र लिहित 'भारत जोडो यात्रेत कोरोना नियमांचं पालन करण्याचे आवाहन केले आहे.
मुंबई : कोरोना (CoronaVirus) नावाचं संकट मागे सारुन सगळं सुरळीत सुरु झालं होतं, मात्र आता पुन्हा एकदा संपूर्ण जगावर या जीवघेण्या व्हायरलचं संकट घोंगावू लागलंय. फक्त चीनच नव्हे तर जपान, दक्षिण कोरिया, ब्राझिल आणि अमेरिका या देशांमध्ये देखील कोरोनानं पुन्हा डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. त्यामुळे भारतानं सावध होत उपाययोजना आखायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय (Mansukh Mandaviya) यांनी राहुल गांधींना (Rahul Gandhi) पत्र लिहित भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) थांबवण्याचे आवाहन केले आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी राहुल गांधी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना पत्र लिहित 'भारत जोडो यात्रेत कोरोना नियमांचं पालन करण्याचे आवाहन केले आहे. यात्रेदरम्यान नियमांचं पालन करता येत नसेल तर भारत जोडो यात्रा थांबवावी, असे देखील मांडवीय आपल्या पत्रात म्हटले आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान कोरोनाच्या प्रसारावर चिंता व्यक्त केली आहे. आरोग्यमंत्री आपल्या पत्रात म्हटले की, कोरोना महामारी ही सार्वजनिक आपत्ती आहे. त्यामुळे देशहितासाठी भारत जोडो यात्रा स्थगित करण्याचा निर्णय घेता येईल. राजस्थानमध्ये सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेत कोरोनाच्या नियमांचे पालन करावे तसेच यात्रेदरम्यान सर्वांनी मास्क आणि सॅनिटायजरटचा वापर करावा. भारत जोडो यात्रेत फक्त कोरोना वॅक्सीन घेतलेल्या नागरिकांना सहभागी होण्याची परवानगी द्यावी.
भारत जोडो यात्रेला भाजप घाबरली : कॉंग्रेस
तर केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांच्या पत्रानंतर भाजपवर टीका केली आहे. देशात भारत जोडो यात्रेदरम्यान कॉंग्रेसला मिळणारे प्रेम पाहून भाजप घाबरली असे म्हटले आहे. कॉंग्रसचे प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले, आरोग्यमंत्र्याच्या पत्रावरून भारत जोडो यात्रेला भाजप किती घाबरली आहे हे दिसून येते. ट्रम्पजींना नमस्ते म्हणताना, मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकार पाडताना, बंगालमध्ये प्रचार करताना, तेव्हाच्या आरोग्य मंत्र्याने मोदीजींना हा सल्ला देण्याची हिंमत दाखवली असती तर देशात कोरोना वाढला नसता. यात्रा योग्य मार्गावर आहे हे स्पष्ट केले आहे.
१/२ या पत्रावरून #भारत_जोड़ो_यात्रा पासून भाजप किती घाबरली आहे हे दिसून येते. ट्रम्पजींना नमस्ते म्हणताना, मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकार पाडताना, बंगालमध्ये प्रचार करताना, तेव्हाच्या आरोग्य मंत्र्याने मोदीजींना हा सल्ला देण्याची हिंमत दाखवली असती तर देशात कोरोना वाढला नसता. pic.twitter.com/mYPLhXxZNj
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) December 21, 2022
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचं जिनोम सिक्वेन्सिंग करण्याचे आदेश
चीनमध्ये कोरोनानं मृत्यूतांडव सुरु केलंय. त्यामुळे भारतानं सावध होत उपाययोजना आखायला सुरुवात केली आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचं जिनोम सिक्वेन्सिंग करण्यात यावं अशा सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना दिल्या आहेत. तसेच केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी आज प्रमुख वैद्यकीय अधिकाऱ्यांची तातडीची बैठक देखील बोलावली आहे.. फक्त चीनच नव्हे तर जपान, दक्षिण कोरिया, ब्राझिल आणि अमेरिका या देशांमध्ये देखील कोरोनानं पुन्हा डोकं वर काढायला सुरुवात केलीय