Nuh Violence : हरियाणातील नूहमध्ये पुन्हा एकदा शोभा यात्रा काढण्यासाठी हिंदू संघटना ठाम; पोलीस प्रशासन सतर्क, 29 ऑगस्टपर्यंत इंटरनेट सेवा बंद
Nuh Violence: हरियाणामधील नूंहमध्ये हिंसाचारामुळे अर्धवट राहिलेली शोभा यात्रा 28 ऑगस्टला काढणार असल्याची घोषणा हिंदू संघटनांकडून करण्यात आली आहे.
हरियाणा : हरियाणामधील नूहमध्ये (Nuh) पुन्हा एकदा हिंदू संघटनांनी शोभा यात्रा (Rally) काढणार असल्याची घोषणा केली आहे. ही शोभा यात्रा 28 ऑगस्ट रोजी काढण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. परंतु प्रशासनाने ही शोभा यात्रा काढण्यासाठी परवानगी नाकारली आहे. त्यामुळे आता प्रशासन देखील सतर्क झाले आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये ही शोभा यात्रा काढू न देण्याचा प्रशासनाचा मानस असल्याचं सांगितलं जात आहे. जिल्ह्यातील सर्व पोलीस स्थानकांच्या अधिकाऱ्यांना त्यांचे पोलीस स्टेशन न सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच विविध भागांमध्ये ड्युटी मॅजिस्ट्रेटची देखील नियुक्ती करण्यात आली आहे. नूहचे पोलीस उपायुक्त धीरेंद्र खडगटा यांनी जिल्ह्यात शांतता राखण्याचे सर्व प्रयत्न केले जाणार असल्याचं स्प्षट केलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
हरियाणाच्या मेवात-नूहमध्ये 31 जुलैला हिंदू संघटनांनी शोभा यात्रा काढली होती. विश्व हिंदू परिषद आणि मातृशक्ती दुर्गा वाहिनीच्या वतीने काढण्यात आलेल्या जलाभिषेक यात्रेच्या दरम्यान हिंसाचाराची घटना घडली. जलाभिषेक रोखण्याचा प्रयत्न करणारा जमाव आणि यात्रेतील भाविक यांच्यामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. या हिंसाचारामध्ये दोन होमगार्डचा मृत्यू झाला. तर दहापेक्षा अधिक पोलीस कर्मचारी जखमी झाले. या घटनेनंतर नूहमध्ये कलम 144 लागू करण्यात आले होते. तसेच 2 ऑगस्टपर्यंत इंटरनेटची सेवा देखील बंद करण्यात आली होती. आता हे प्रकरण शांत झाल्यानंतर पुन्हा एकदा ही शोभा यात्रा काढण्याची घोषणा हिंदू संघटनांनी केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नूहमध्ये परिस्थिती बिघडू नये म्हणून प्रशासन सतर्क झाले आहे.
29 ऑगस्टपर्यंत इंटरनेट सेवा बंद
या शोभा यात्रेची घोषणा केल्यानंतर नूहमध्ये इंटरनेटची सेवा बंद करण्यात आली आहे. संपूर्ण जिल्ह्यात 29 ऑगस्ट रात्री 12 पर्यंत ही इंटरनेटची सेवा बंद राहणार आहे. तसेच नूहचे पोलीस उपायुक्त धीरेंद्र खडगटा यांनी कलम 144 लागू केलं असल्याची माहिती दिली आहे. सध्या तरी जिल्ह्यातील बँका आणि शाळा बंद केलेल्या नाहीत. पण कायदा आणि सुव्यवस्था पाळण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यामध्ये पोलीस प्रशासनाकडून गस्त घालण्यात येत आहे. तसेच वेगवेगळे नियम देखील लावले जात आहेत.
विरोधक हुकूमशाहीला जन्म देत आहेत - टिकैत
नूह शोभा यात्रेवर शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. विरोधक हुकुमशाहीला जन्म देत असल्याचं टिकैत यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी मुस्लिमांना भारतीय हिंदू म्हटले आहे. यासोबतच शोभा यात्रा निघाल्यास त्यांची ट्रॅक्टर रॅलीही निघेल असा इशाराही त्यांनी दिला आहे.
हेही वाचा :
Nuh Violence: हरियाणा हिंसाचार प्रकरण : चिथावणी देणारा आरोपी बिट्टू बजरंगीला फरीदाबादमधून अटक