पर्यंटकांचं आकर्षणाचं केंद्र ठरला 'मृत्यू'चा सापळा; 142 वर्ष जुना मोरबीतील झुलता पूल, दुरुस्तीनंतर 5 दिवसांतच कोसळला
Gujarat Morbi Bridge Collapse : दुरुस्तीनंतर 25 ऑक्टोबरला सुरु झालेला पूल कोसळल्याने चौकशीसाठी एसआयटीची स्थापना. 100 जणांची क्षमता असताना दुर्घटनेवेळी 400 जण उपस्थित असल्याची माहिती.
Gujarat Morbi Bridge Collapse : गुजरातच्या मोरबी (Morbi News) जिल्ह्यात एक झुलता पूल (Morbi Bridge Collapse) कोसळला असून त्यात 140 जणांचा मृत्यू झाला आहे. नदीत पडलेल्या लोकांचा शोध सुरु असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरु असल्याची माहिती गुजरात सरकारनं दिली आहे. दरम्यान, प्रशासनाकडून बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे.
गुजरातमधील (Gujrat News) मोरबीमध्ये काल सायंकाळी एक मोठी दुर्घटना घडली. मोरबी जिल्ह्यातील मच्छू नदीवरील झुलता पूल अचानक कोसळला. या दुर्घटनेत 140 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 100हून अधिक जण जखमी झाले आहेत. सुमारे 400 हून अधिक लोक नदीत कोसळल्याची भीती व्यक्त होत आहे. बचावासाठी एनडीआरएफ आणि गरूड कमांडोंकडून घटनास्थळी युद्धपातळीवर मदतकार्य सुरु आहे. दरम्यान, 5 दिवसांपुर्वीच हा पूल दुरुस्त करण्यात आला होता. यामुळे पुलाच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होतं आहे. पुलाची देखभालदुरुस्ती करणाऱ्या कंपनींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच अधिक चौकशीसाठी एसआयटीचीही स्थापना करण्यात आली आहे. 100 जणांची क्षमता असलेल्या पुलावर दुर्घटनेवेळी 400 जण उपस्थित असल्याची माहिती मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघाताबाबत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि राज्याच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. बचावकार्यासाठी तातडीनं पथकं पाठवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यासंदर्भात एक ट्वीट देखील केलं आहे. दरम्यान आज पंतप्रधान मोदी घटनास्थळी भेट देण्याची शक्यता आहे.
मोरबीतील आकर्षणाचं केंद्र होता पूल
मोरबीतील मच्छू नदीवर बांधलेल्या हा झुलता पूल एक, दोन वर्ष नाही, तर तब्बल 140 वर्ष जुना आहे. या पुलाचा इतिहास सुमारे 140 वर्षांचा आहे. या पुलाबद्दल बोलायचं झालं तर ते गुजरातच्या प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे. येथे दररोज मोठ्या संख्येने लोक येत असतात. या पुलाचं वैशिष्ट्य म्हणजे, हा झुलता पूल आहे. ऋषिकेशमधील राम आणि लक्ष्मणाच्या झुल्यासारखाच हा पूल होता. त्यामुळे इथे मोठ्या संख्येनं लोक यायचे. रविवारी या पुलावर 500-700 लोक एकत्र जमल्यानं पुलाला भार सहन झाला नाही आणि पूल कोसळून नदीत पडला.
1880 मध्ये बांधण्यात आलेला पूल
मोरबी येथील मच्छू नदीवर बांधण्यात आलेल्या या पुलाचं बांधकाम 1880 मध्ये पूर्ण झालेलं. त्यावेळचे मुंबईचे गव्हर्नर रिचर्ड टेंपल यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बनवण्यासाठी सुमारे साडेतीन लाख रुपये खर्च झाले होते. या पुलाच्या बांधकामाचं सर्व साहित्य ब्रिटनमधून आलं होतं. बांधकाम झाल्यापासून ते दुर्घटनेपूर्वीपर्यंत या पुलाची अनेकवेळा डागडुजी करण्यात आली आहे. या पुलाची लांबी 765 फूट होती. तर हा पूल 1.25 मीटर रुंद आणि 230 मीटर लांब होता. हा पूल भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचाही साक्षीदार आहे. हा भारतातील सर्वात जुन्या पुलांपैकी एक होता, त्यामुळे तो पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र होता. या पुलावर जाण्यासाठी 15 रुपयांचं शुल्क आकारलं जात होतं.
पाहा व्हिडीओ : गुजरातच्या मच्छू नदीवरील पूल कोसळला,युद्ध पातळीवर रेस्क्यू ऑपरेशन सुरू
6 महिन्यांच्या दुरुस्तीनंतर 25 ऑक्टोबर रोजी पूल पुन्हा सुरु
गेल्या 6 महिन्यांपासून हा पूल दुरूस्तीमुळे सर्वसामान्यांसोबतच पर्यटकांसाठी बंद होता. 25 ऑक्टोबरपासून तो पुन्हा लोकांसाठी खुला करण्यात आला. या 6 महिन्यांत पुलाच्या दुरुस्तीसाठी सुमारे दोन कोटी रुपये खर्च करण्यात आले. या पुलाच्या देखभालीची जबाबदारी सध्या ओधवजी पटेल यांच्या मालकीच्या ओरेवा ग्रुपकडे आहे. ओरेवा ग्रुपनं मोरबी नगरपालिकेसोबत मार्च 2022 ते मार्च 2037 असा 15 वर्षांसाठी करार केला आहे. या कराराच्या आधारे या पुलाची देखभाल, स्वच्छता, सुरक्षा आणि टोल वसुली या सर्व जबाबदाऱ्या ओरेवा ग्रुपकडे आहेत.
नक्की चूक काय झाली?
जिंदाल ग्रुपनं या पुलासाठी 25 वर्षांची हमी दिली होती. एकाच वेळी 100 जणांना या पुलावर चढण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र या पुलाचं ऑडिट शासनाच्या तीन एजन्सीकडून तपासायचं होतं, मात्र घाईघाईत जय सुख भाई पटेल यांनी दिवाळीत त्यांच्या नातीच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन केलं. अपघाताच्या वेळी पुलावर 500-700 लोक उपस्थित असल्याचं सांगितलं जात आहे.