Gujarat Election Results 2021 : गुजरात स्थानिक निवडणुकांमध्ये भाजपचीच हवा, पराभवानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा
Gujarat Election Results 2021 : गुजरातमधील स्थानिक जिल्हा परिषदा आणि तालुका पंचायत निवडणुकांमध्ये भाजपचीच हवा असल्याचे पाहायला मिळाले. राज्यात काँग्रेससह विरोधकांचा सुपडा साफ झाला आहे. या मोठ्या पराभवानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्षांसह विरोधी पक्ष नेत्यांनी राजीनामा दिला आहे.
गांधीनगर: गुजरातमधील स्थानिक जिल्हा परिषदा आणि तालुका पंचायत निवडणुकांमध्ये भाजपचीच हवा असल्याचे पाहायला मिळाले. राज्यात काँग्रेससह विरोधकांचा सुपडा साफ झाला आहे. या मोठ्या पराभवानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्षांसह विरोधी पक्ष नेत्यांनी राजीनामा दिला आहे.
गुजरातमध्ये 81 नगरपालिका, 31 जिल्हा परिषद आणि 231 तालुका पंचायत निवडणुकांचे निकाल काल लागले. या निकालात भारतीय जनता पक्षानं जोरदार मुसंडी मारत सत्ता कायम राखली आहे. भाजपने सर्व 31 जिल्हा परिषदांसह 231 तालुका पंचायतींपैकी 196 पंचायती आणि 81 नगरपालिकांमधील 74 नगरपालिकांमध्ये स्पष्ट बहुमत प्राप्त केलं आहे. राज्यात काँग्रेसला केवळ एक नगरपालिका आणि 18 तालुका पंचायतींमध्येच विजय मिळवता आला आहे. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांची ही रंगीत तालिम मानली जात होती. ज्यामध्ये भाजपनं मोठा विजय मिळवला आहे. या निवडणुकीत एआयएमआयएम आणि आपनं केवळ हजेरी लावण्याचं काम केलं आहे.
या निकालानंतर काँग्रेसमधून राजीनाम्याची साखळी सुरु झाली आहे. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अमित चावडा आणि विरोधी पक्ष नेते परेश धनानी यांनी राजीनामा दिला आहे. पराभवानंतर चावडा यांनी ईव्हीएम मशीनवर आक्षेप घेतले आहेत.
दरम्यान या मोठ्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या जनतेचे आभार मानले आहेत. या निकालावरुन स्पष्ट होत आहे की, गुजरातमध्ये भाजपचा विकास आणि सुशासनाचा अजेंडा मजबुतीनं काम करत आहे. भाजपवर विश्वास दाखवल्याबद्दल मी गुजरातच्या लोकांना नमन करतो, असं मोदींनी म्हटलं आहे.
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी देखील जनतेचे आभार मानले आहेत. भाजपावर विश्वास व्यक्त केल्याबद्दल गुजरातच्या जनतेला धन्यवाद देतो. हे स्थानिक पंचायत निवडणुकांचे निकाल विकास आणि विश्वासाचे प्रतिक आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.