27 वर्षांपासून गुजरातमध्ये भाजपचा झेंडा, केजरीवालांचा आप पक्ष भाजपचा अश्वमेध रोखणार?
Gujarat : गुजरातमध्ये यंदा काँग्रेसऐवजी भाजपचा सामना आम आदमीशी असणार आहे अशी चर्चा आहे. कारण गुजरात प्रभारी राजीव सातव यांच्या निधनानंतर काँग्रेसला एकसंध ठेऊ शकेल असं नेतृत्व गुजरातमध्ये नाही.
Gujarat Assembly Election 2022 : मोरबीचा झुलता पूल कोसळून 135 जणांचा जीव गेला, त्याच्या दुसऱ्या दिवशी मोदी बनासकांठामध्ये विकासकामांचं उद्घाटन करत होते. 1 नोव्हेंबरला मोदींनी मोरबी दुर्घटनास्थळाची पाहणी केली, आणि आज निवडणूक आयोगानं गुजरातच्या निवडणुकीची घोषणा केली. गुजरातमध्ये यंदा काँग्रेसऐवजी भाजपचा सामना आम आदमीशी असणार आहे अशी चर्चा आहे. कारण गुजरात प्रभारी राजीव सातव यांच्या निधनानंतर काँग्रेसला एकसंध ठेऊ शकेल असं नेतृत्व गुजरातमध्ये नाही. दुसरीकडे गेल्या निवडणुकीतले दोन हिरो अर्थात हार्दिक पटेल आणि अल्पेश ठाकोर जे काँग्रेससोबत होते, ते दुरावले आहेत. जिग्नेश मेवानींचा प्रभाव मर्यादीत आहे. त्यामुळे सगळी धुरा अमित छावडा, परेश धनानी अशा तरुण तुर्कांवर आहे.
मागील 27 वर्षांपासून गुजरातमध्ये भाजपचा झेंडा आहे. त्यातली साडेबारा वर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. 1995 नंतर तिथं काँग्रेसला तोंड वर काढण्याची संधीही भाजपनं दिली नाही. 2002 च्या गोध्रा दंगलीनंतर भाजपनं प्रखर हिंदुत्वाची भूमिका घेतली. आणि त्याच यूएसपीवर पुढचं राजकारणही केलं. त्यामुळे टोकाची हिंदुत्वाची भूमिका घेतल्याशिवाय गुजरातमध्ये पाय रोवणं अशक्य आहे हा राजकीय इतिहास आहे.
मागील निवडणुकीवेळी राहुल गांधींनी अख्खा गुजरात पिंजून काढला होता. अंबाजी, सोमनाथ, द्वारकापासून ते पोरबंदरपर्यंत सगळ्या देवस्थानांच्या चरणी ते लीन झाले. या काळात कुठेही प्रॉमिनंट मुस्लिम चेहरा त्यांच्या आजूबाजूला दिसणार नाही, याचीही काळजी घेण्यात आली होती. नोटाबंदी, जीएसटीचे मुद्देही त्यांनी आक्रमकपणे मांडले होते. पण यंदा राहुल यांची भारत जोडो यात्रा गुजरातला बायपास करुन जाणाराय, त्यामुळे गलितगात्र काँग्रेसची आणखीच अडचण होणार हे निश्चित आहे.
गेल्यावेळी हार्दिक अँग्री यंग मॅनच्या भूमिकेत होते, यंदा ती जागा आम आदमीच्या गोपाल इटालियांनी घेतलीय. पोलिसात आणि प्रशासनात नोकरी केल्यानंतर त्यांनी राजकारणात उडी घेतलीय. गुजराती राजकारणात पटेल प्रभावी आहेत, आणि इटालिया याच समाजातून येतात. त्यामुळे भाजपविरोधकांमध्ये त्यांना सहानुभुती आहे. गेल्यावेळीही दिल्ली मॉडेल दाखवत आम आदमीनं गुजरातची निवडणूक लढली होती. मात्र तीसपैकी एकाही जागेवर त्यांचं डिपॉझिट वाचलं नव्हतं. आता केजरीवालांनी गुजरातचा ट्रेंड लक्षात घेऊन रणनीती आखलीय. त्यामुळेच नोटांवर गणपती आणि लक्ष्मीचा फोटो छापण्याची मागणी करुन त्यांनी भाजपची गोची केली.
केजरीवाल यांनी दिल्ली आणि पंजाबप्रमाणेच मोफत वीजबिलाची घोषणा केलीय. शिक्षण आणि आरोग्याचे मुद्देही अजेंड्यावर आहेत. त्यामुळेच रेवडीपासून सावध राहा असं थेट पंतप्रधानांना सांगावं लागलं होतं. पोपटाचा प्राण कंठात असतो त्याप्रमाणेच मोदींचं सगळं लक्ष गुजरातवर आहे. त्यामुळेच वेदांता फॉक्सकॉन असेल किंवा एअरबसचा प्रकल्प किंवा त्याआधी साकारलेली गिफ्ट सिटी किंवा बुलेट ट्रेन हे सगळे प्रकल्प गुजरातमध्ये नेण्यात त्यांनी यश मिळवलंय. पण बेरोजगारी आणि महागाईमुळे असलेली नाराजी त्यामुळे कमी होणार का? मोरबीच्या दुर्घटनेमुळे गुजरात मॉडेलवर विरोधक प्रश्न उपस्थित करतायत. त्याचा परिणाम मतपेटीत दिसणार का? हे पाहावं लागणार आहे.