Greta Thunberg: कोरोनाशी संघर्ष करणाऱ्या भारताला मदत करा; पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गचे जागतिक समुदायाला आवाहन
भारतातील परिस्थिती अत्यंत वेदनादायी असून जागतिक समुदायाने या काळात भारताला मदत करावी असं आवाहन पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने (Greta Thunberg) केलं आहे.
नवी दिल्ली : कोरोनाच्या उद्रेकामुळे भारतातील परिस्थिती चिंताजनक बनत चालली आहे. देशात रोज कोरोनाबाधित रुग्णसंख्येचा आणि मृत्यूच्या आकड्याचा नवीन विक्रम होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान बदलासंबंधी काम करणारी स्वीडिश कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने (Greta Thunberg) भारतातील कोरोनाच्या स्थितीवर एक ट्वीट केलंय आणि कोरोना विरोधात संघर्ष करणाऱ्या भारताला जगाने मदत करावी असं आवाहन केलं आहे.
भारतात कोरोनामुळे निर्माण झालेली ही स्थिती अत्यंत वेदनादायी आहे. जागतिक समुदायाने पुढाकार घेतला पाहिजे आणि भारताला आवश्यक ती सर्व मदत केली पाहिजे असं आवाहन ग्रेटा थनबर्गने आपल्या ट्वीटच्या माध्यमातून केलं आहे.
Heartbreaking to follow the recent developments in India. The global community must step up and immediately offer the assistance needed. #CovidIndia https://t.co/OaJVTNXa6R
— Greta Thunberg (@GretaThunberg) April 24, 2021
भारतात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना ऑक्सिजनच्या अभावी अनेक रुग्ण दगावत असल्याचं दिसून येतंय. रोजच्या मृतांच्या आकड्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यातच कोरोनामुळे भारतात दररोज पाच हजार लोकांचा मृत्यू होईल असा धक्कादायक निष्कर्ष वॉशिंग्टन विद्यापीठाच्या अभ्यासात समोर आला आहे. सध्या सातत्याने भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव आणि मृतांची संख्या वाढतेय. एप्रिल ते जुलै या काळात भारतातील तीन लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होणार असल्याचा अंदाज या अभ्यासात व्यक्त करण्यात आला आहे
देशातील परिस्थिती चिंताजनक
देशात कोरोनामुळे प्राण गमावलेल्यांचा आकडा दिवसागणिक वाढताना दिसत आहे. दररोज तीन लाखांहून अधिक नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद होताना दिसत आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 3,49,691 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर कोरोनामुळे 2,767 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, 2,17,113 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. यापूर्वी शुक्रवारी देशात 3,46,786 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती.
दरम्यान, चार दिवसांत देशात 13 लाखांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली होती. 21 एप्रिलपासून 24 एप्रिलपर्यंत क्रमश: 3.14 लाख, 3.32 लाख, 3.46 लाख, 3.49 लाख रुग्णांची नोंद झाली आहे. हा आकडा जगभरातील इतर देशांच्या तुलनेत सर्वाधिक आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Delhi Lockdown Extended: ऑक्सिजन तुटवडा, कोरोना रुग्णसंख्यावाढ या कारणांमुळं दिल्लीतील लॉकडाऊनचा कालावधी वाढवला
- Mann ki Baat | अफवांवर विश्वास ठेऊ नका, लसीकरणाचा लाभ घ्या : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आवाहन
- Corona Crisis : कोरोनामुळे भारतात दररोज 5 हजार मृत्यू होणार? वॉशिंग्टन विद्यापीठाचा काळजाचा ठोका चुकवणारा इशारा