'एकवेळ तुमचं नाव बदलेल पण हैदराबादचं नाव बदलणार नाही'; ओवेसींचा योगींवर पलटवार
हैदराबाद महापालिका निवडणुकीमुळे (Greater Hyderabad Municipal Corporation Election) राजकीय वातावरण तापलं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हैदराबादचं नाव भाग्यनगर करु असं म्हटल्यानंतर एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी त्यांच्यावर चांगलाच पलटवार केला आहे.
हैदराबाद: ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाने आपल्या बड्या बड्या नेत्यांना प्रचारासाठी रिंगणात उभं केलं आहे. त्यामुळे निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापलं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हैदराबादचं नाव भाग्यनगर करु असं म्हटल्यानंतर एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी त्यांच्यावर चांगलाच पलटवार केला आहे. ज्यांना हैदराबादचं नाव बदलायचंय, त्यांच्या पिढ्या उद्ध्वस्त होतील. एकवेळ तुमचं नाव बदलेल पण तरीही हैदराबादचं नाव बदलणार नाही, अशा शब्दात ओवेसींनी योगींवर पलटवार केला आहे. ज्यांना शहराचं नाव बदलायचंय, त्यांना आता जनतेनंच प्रत्युत्तर द्यायचंय, असं ओवेसींनी म्हटलं आहे.
ओवेसी म्हणाले की, भाजपनं या निवडणुकीत इतक्या लोकांना बोलावलंय की आता केवळ डोनाल्ड ट्रम्प यायचे राहिले आहेत. ते जरी आले तरीही काही होणार नाही. कारण मोदींनी त्यांना हात देत अबकी बार ट्रम्प सरकार म्हटलं होतं. पण ट्रम्प खड्ड्यात पडले. त्यांना लाख लाख वेळा मला जिन्ना म्हणावं. पण आम्ही जिन्नाच्या हाकेला प्रतिसाद दिलाच नव्हता. जे रजाकार होते, ते पाकिस्तानात गेले आणि जे प्रामाणिक होते, ते हैदराबादमध्येच राहिले, असं ओवेसी म्हणाले.
काय म्हणाले होते योगी आदित्यनाथ ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाने आपल्या बड्या बड्या नेत्यांना प्रचारासाठी रिंगणात उभं केलं आहे. त्यामुळे निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापलं आहे. योगी आदित्यनाथ भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी हैदराबादेत आले होते. त्यावेळी प्रचारादरम्यान त्यांनी हैदराबादचं नाव भाग्यनगर करण्याचं आश्वासन दिलं होतं. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी शनिवारी तेलंगानाची राजधानी हैदराबादमध्ये ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचारासाठी मलकजगिरी भागात रोड शो केला.
"इथं आल्यानंतर मला अनेकांनी हैदराबादचं नाव भाग्यनगर होऊ शकतं का? असं विचारलं. मी त्यांनी म्हटलं का नाही? आम्ही फैजाबादचं नाव अयोध्या केलं, अलाहाबादचं नाव प्रयागराज केलं. उत्तर प्रदेशात भाजपची सत्ता आल्यानंतर हे बदल घडले मग हैदराबादचं नाव भाग्यनगर का होणार नाही?" असे योगी आदित्यनाथ म्हणाले होते.
ओवेसी यांनी या निवडणुकीसाठी येथे 51 उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. हैदराबाद महापालिका निवडणुकीतही असदुद्दीन ओवेसी यांनी जुन्या हैदराबाद भागातही आपल्या पक्षाचे उमेदवार मैदानात उतरवले आहेत. भाजपाला प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी पुढे येण्याचं आवाहन देखील त्यांनी या वेळी केलं.