मुंबई : 'तुम्ही एकतर गांधीजींचे फॅन होऊ शकता किंवा नेताजींचे समर्थक. तुम्ही एकाच वेळी दोघांचे समर्थक होऊ शकत नाही. त्यामुळे हा निर्णय स्वत: घ्या.' असं कंगना पुन्हा एकदा बरळली आहे. आपल्याला स्वातंत्र्य हे भीकेच्या स्वरुपात मिळालंय, तुम्ही विचार करुन तुमचे हिरो ठरवा असं वादग्रस्त वक्तव्य कंगनाने केलं आहे. कोणत्याही विषयावर आपल्या अकलेचे तारे तोडणाऱ्या कंगनाने आता थेट इतिहासात उडी घेत गांधीजी (Mahatma Gandhi) आणि सुभाषबाबू (Netaji Subhash Chandra Bose) जणू काही एकमेकांचे विरोधकच होते असं चित्र निर्माण केलं. बरं, असंही नाही की कंगनाने तिच्या वक्तव्याला काही ऐतिहासिक संदर्भ दिले आहेत. पण कंगनाने सुभाषबाबूंच्या अंगरक्षकाच्या एका बातमीचा संदर्भ दिला आणि तिच्या वक्तव्याने सोशल मीडियावर गांधी विरुद्ध नेताजी अशी चर्चा मात्र सुरु झालीय.  ही दोघं खरोखरच तसे विरोधक होते का? किंवा या दोघांत मनभेद होते का? याचं उत्तर नक्कीच नाही असं आहे. गांधीजी आणि नेताजी सुभाषबाबूंचे वैचारिक मतभेद जरूर होते पण त्यांच्यामध्ये मनभेद नव्हते. 


नेताजींनी गांधींचा उल्लेख 'राष्ट्रपिता' असा केला
याचं एकच उदाहरण पुरेसं बोलकं आहे. 6 जुलै 1944 साली नेताजी सुभाषचंद्र यांनी रंगून रेडिओ स्टेशनवरून संबोधन करताना महात्मा गांधींनी 'फादर ऑफ द नेशन' म्हणजे राष्ट्रपिता अशी उपाधी दिली होती. गांधींजीसाठी 'राष्ट्रपिता' या भारतातील सर्वात सन्मानजनक शब्दाचा प्रयोग सर्वप्रथम असं नेताजी सुभाषबाबूंनी केला होता. 


समाजवादाचे तरुण तुर्क 
महात्मा गांधींनी ब्रिटिशांविरोधात सुरु केलेल्या लढाईमध्ये त्यांना नेहरु आणि सुभाषबाबू असे दोन भक्कम खांदे मिळाले होते. पण हे दोघेही समाजवादाने प्रेरित होते. भारताच्या स्वातंत्र्यानंतर नव्या भारताचे समाजवादी व्हिजन या दोघांनीही ठरवलं होतं. पण या दोघांनीही गांधीजींच्या अनेक मतांना विरोध केल्याचे संदर्भ आहेत. पण तरीही त्यांनी कधीही गांधीजींची साथ सोडली नाही. 


ज्यावेळी असहकार चळवळ अचानक थांबवण्याचा निर्णय गांधीजींनी घेतला त्यावेळी चिंत्तरंजन दास, जवाहरलाल नेहरु आणि सुभाषचंद्र बोस हे नाराज झाले. चित्तरंजन दास यांनी स्वराज्य पार्टीची स्थापना केली त्यावेळी त्यांना भेटायला गांधीजींनी सुभाषबाबूंना पाठवलं होतं.


ज्यावेळी देशावर संकट, त्यावेळी गांधीजींना सुभाषबाबूंची आठवण
गांधीजींनी 4 जून 1925 रोजी 'यंग इंडिंया' या त्यांच्या वृत्तपत्रात पूर परिस्थितीवर एक लेख लिहिला होता. ते म्हणतात की, "ज्यावेळी देशामध्ये अशा प्रकारचे नैसर्गिक संकट येतं त्यावेळी मला सुभाषची आठवण येते. सुभाषने 1922 मध्ये उत्तर बंगालमध्ये आलेल्या पुराच्या वेळी प्रचंड मेहनत केली होती. आपत्तीकाळात केवळ सेवा करायची इच्छा असून उपयोग नसतो तर त्यामधले ज्ञान आणि योग्यता असणं अत्यंत महत्वाचं असतं, ती सुभाषमध्ये आहे."


त्रिपुरी काँग्रेसमध्ये विजय


गांधीजी आणि नेताजींच्या मध्ये असलेल्या वैचारिक मतभेदाचा पुरावा देण्यासाठी गांधींचे विरोधक नेहमी 1939 सालच्या त्रिपुरी काँग्रेस अधिवेशनाचा संदर्भ देतात. 1939 सालच्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सुभाषबाबूंनी गांधीजींच्या विरोधात जाऊन निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. त्यावेळी पट्टाभी सितारमय्या यांचा पराभव हा माझा पराभव आहे असं गांधींनी म्हटलं होतं. पण 4 फेब्रुवारी 1939 रोजी 'यंग इंडिया'मध्ये लिहिलेल्या लेखात म्हणतात की, "सुभाषच्या विजयाने मला आनंद झाला आहे. पण पट्टाभी सितारमय्या यांना निवडणुकीसाठी मी उभं रहायला सांगितलं होतं, त्यामुळे मला वाटतं की हा पराभव त्यांचा नसून माझा आहे." 


'गांधी ब्रिगेड'ची स्थापना
गांधीजींचा स्वातंत्र्याचा मार्ग हा अहिंसेचा होता. तर दुसऱ्या महायुद्धामध्ये ब्रिटनच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन त्यांच्याविरोधात सशस्त्र मार्गाने लढावं, त्यासाठी हिटलरची मदत घ्यावी असं मत सुभाषबाबूंचं होतं. त्यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केल्यानंतर राणी लक्ष्मीबाईंच्या नावाने एक महिला पलटण तयार केली होती. त्याचसोबत त्यांनी गांधीजींच्या नावाने गांधी ब्रिगेड, नेहरु ब्रिगेड आणि आझाद ब्रिगेड अशा तीन पलटणी तयार केल्या होत्या. यावरुनच त्यांचे गांधींजींवरील प्रेम लक्षात येतं. 


सुभाषबाबू हिंदू-मुस्लिम एकात्मतेचे खंदे समर्थक होते. आझाद हिंद सेना म्हणजे हिंदू-मुस्लिम यांच्या ऐक्याचं अप्रतिम उदाहरण असल्याचं गांधीजी म्हणाले होते. 


गांधीजींच्या जन्मदिनानिमित्त नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी 1943 साली बँकॉक रेडिओवरुन संबोधन केलं होतं, ते म्हणाले होते की, "जेव्हा सर्व भारतीयांच्या मनात निराशा दाटून आली होती त्यावेळी गांधीजींचा उदय झाला. त्यांनी आपल्या सोबत असहकाराचा, सत्याग्रहाचा एक अनोखा मार्ग आणला. एका क्षणात सर्व देश त्यांच्यासोबत आला. गांधींच्यामुळे लोकांच्या मनात एक आत्मविश्वास निर्माण झाला आहे, प्रत्येकाला एक आशेचा किरण दिसला. 1920 साली गांधींनी लढा सुरु केला नसता तर आजही भारत असहाय्यच राहिला असता. देशसेवेचं त्यांचं कार्य हे अतुल्य आहे."


सोशल मीडियावर आज गांधीजी आणि सुभाषबाबूंचे असं चित्र रंगवलं जातं की ते एकमेकांचे कट्टर विरोधक होते. पण खरं चित्र तसं नव्हतंच मुळात. गांधीजी नेहमी म्हणायचे की, मला दोन मुलं आहेत, एक जवाहर आणि दुसरा सुभाष. 23 ऑगस्ट 1945 रोजी सुभाषबाबूंच्या विमान अपघातानंतर गांधीजींनी दु:ख व्यक्त केलं होतं. गांधीजी म्हणाले होते की, सुभाषबाबू हे सच्चे देशभक्त असून त्यांनी देशासाठी बलिदान दिलं.


गांधीजी आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांची चर्चा सुरु असताना आपण या प्रसंगांचा संदर्भ पाहिला पाहिजे. या दोघांचेही हृदय आणि मन हे मोठं होतं. त्या दोघांमधील संबंध समजून घेण्यासाठी आपल्याला आपलंही मन आणि हृदय हे मोठं करावं लागेल. कारण कंगनासारखे काही खुज्या मनाचे लोक इतिहासाची तोडमोड करुन तो समोर आणतात. 


संबंधित बातम्या :