मुंबई : हवेतून पसरणाऱ्या कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी आतल्या खोल्यांमध्ये व्हेंटिलेशन कशा प्रकारे असावे हे समजून घेणे  खूप महत्वाचे आहे. ज्यावेळी एखादी कोरोना संसर्ग झालेली व्यक्ती बोलते, शिंका देते, गाणं गाते, खोकते त्यावेळी अगदी सूक्ष्म तुषार तिच्या तोंडातून हवेत मिसळतात. हवेत मिसळलेले हे थेंब जेव्हा दुसरा कोणी व्यक्ती त्याच खोलीमध्ये श्वास घेतो, त्यावेळी हवेत पसरलेल्या या विषाणूमुळे त्या व्यक्तीला कोरोना संसर्ग होण्याचा धोका वाढतो. यावर अधिकचा अभ्यास करण्यासाठी आयआयटी मुंबईने हवेच्या प्रवाहाबाबत आणि व्हेंटिलेशन सिस्टम संदर्भात संशोधन करण्याचे ठरवले व हे संशोधन आता पूर्ण झाले आहे. 


या संशोधनामध्ये सुरुवातीला त्यांनी सार्वजनिक स्वच्छतागृह जिथे अनेक जण रोज वापर करतात. शिवाय, याठिकाणी पाणी हा मुख्य स्त्रोत आहे.  तसेच हॉटेल्स, रेस्टॉरंट्स ,रेल्वे , शाळा, विमान अशा ठिकाणी जिथे मोठ्या प्रमाणावर गर्दी असते त्या सार्वजनिक ठिकाणी सुद्धा व्हेंटिलेशनची प्रणाली नेमकी कशी आहे? आणि संसर्गाचा धोका नेमका किती आहे? या गोष्टींचा शोध घ्यायचा प्रयत्न केला. यामध्ये सार्वजनिक स्वछतागृहात संसर्ग होण्याचा धोका हा इतर बंद खोलीच्या तुलनेत 10 पटीने जास्त आढळला. कारण या स्वछतागृहांच्या बंदिस्त खोलीमध्ये हवा घुटमळून राहते व त्याचे योग्य पद्धतीने हवेचे व्हेंटिलेशन होत नाही. त्या ठिकाणच्या डेड झोनमध्ये संसर्ग होण्याचा धोका वाढतो.


आदर्शपणे, ताज्या हवेने खोलीच्या प्रत्येक भागातून हवा सतत काढून टाकली पाहिजे आणि बदलली पाहिजे. जेव्हा हवा डेड झोनमध्ये अडकलेली असते तेव्हा हे करणे सोपे नसते. संसर्गाचा प्रसार कमी करण्यासाठी आतल्या खोल्यांमध्ये जागेला हवेशीर कसे करावे ? याभोवती केंद्रीत हे संशोधन होते. पंखे आणि व्हेंटिलेशन डक्ट कोठे ठेवाव्यात? किती असावेत ? किती हवा याद्वारे खोलीत यावी ? अशा प्रश्नांची उत्तरे या संशोधनातून समोर मांडली आहे. 


मुंबई आयआयटीच्या एरोस्पेस इंजिनिरिंग विभागाचे प्राध्यापक कृष्णेंदू सिन्हा ज्यांनी हे संशोधन केले त्यांच्या म्हणण्यानुसार, 'सध्या, व्हेंटिलेशन डिझाइन अनेकदा प्रति तास हवेतील बदलांवर आधारित असते. ही डिझाइनची गणना गृहीत धरते की ताजी हवा खोलीच्या प्रत्येक कोपऱ्यात एकसारखी पोहोचते. संगणकावरून वास्तविकपणे सार्वजनिक स्वच्छतागृहमध्ये सिम्युलेशन आणि प्रयोग, आम्हाला माहित आहे की असे होत नाही. प्रत्येक तासाला हवा बदलणे हे खोलीच्या सगळ्या भागात सारखे नसते. डेड झोनमध्ये जिथे हवा घुटमळते, अडकून राहते तिथे हवा प्रतितास बदलण्याचा कालावधी हा 10 पटीने कमी असतो. त्यामुळे कोरोना सारख्या विषाणूचा हवेतून होणारा संसर्गचा प्रमाण कमी करायचे असेल तर त्यानुसार व्हेंटिलेशन डिझाइन करायला हवे. त्यासाठी विशिष्ट ठिकाणी पंखे आणि व्हेंटिलेशन डक्ट बसवायला हवेत, जेणेकरून हवा खेळती राहील व खोलीच्या प्रत्येक भागात ताजी हवा प्रतितास पोहचेल. आंधळेपणाने, सध्या असलेल्या व्हेंटिलेशन डक्ट मधून हवेचे प्रमाण वाढल्याने ही समस्या सुटणार नाही'.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha



संबंधित बातम्या :