Kangana Ranaut Statement : कंगनानंतर आता ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेही वादात अडकण्याची शक्यता आहे. कारण काही दिवसांपूर्वी अभिनेत्री कंगना रनौतनं केलेल्या स्वातंत्र्याबद्दलच्या वक्तव्याचं गोखलेंनी समर्थन केलंय. 1947 साली देशाला मिळालेलं स्वातंत्र्य म्हणजे भीक होती असं कंगना म्हणाली होती. त्यानंतर देशात मोठा वाद निर्माण झाला होता. कंगनाच्या त्याच वक्तव्याचं विक्रम गोखले यांनी समर्थन केलंय. ७५ व्या वाढदिवसानिमित्त ब्राह्मण महासंघाच्या वतीनं ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना गोखलेंनी हे विधान केलंय. यावेळी मोदींचं कौतुक केलं. तर शिवसेना आणि भाजप एकत्र आल्यास बरं होईल असंही त्यांनी म्हटलंय.


स्वातंत्र्यासंबंधी कंगना रनौतने केलेल्या वक्तव्यावरुन वाद निर्माण झालेला असताना आता पुन्हा या वादात भर पडलीय, कंगनाच्या या वक्तव्याचे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी समर्थन केले आहे. विक्रम गोखले यावेळी म्हणाले की,  कंगना जे म्हणाली ते खरंय, मी समर्थन करतो त्या वक्तव्याचे, कुणाच्याही मदतीने स्वातंत्र्य मिळाले नाही, ते भिकेनेच मिळाले आहे. आपले स्वातंत्रवीर जेव्हा फाशीवर जात होते तेव्हा फाशीपासून त्यांना कोणी वाचवलं नाही अनेकजण बघत राहिले असा गंभीर आरोप विक्रम गोखले यांनी यावेळी केला. 75 व्या वाढदिवसानिमित्त ब्राह्मण महासंघाच्या वतीनं ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना विक्रम गोखले यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. यावेळी बोलताना कंगनाच्या वक्तव्याला पाठिंबा दर्शवत देश कधीही हिरवा होणार नाही, हा देश भगवा राहिला पाहिजे, असं वक्तव्य गोखले यांनी केलं.


नेमकं चाललेय काय?
राजकीय वर्तुळात परिस्थिती गंभीर झालेली आहे, कोणाची नावं घेत नाही. ब्राह्मण समाजवरती टीकेची झोड उठवणे, मराठा आणि ब्रह्मणांमध्ये मतभेद निर्माण करणे काय चाललंय हे? कुणबी, क्षत्रिय हे सर्व माझे आहेत. दलितांना दलित म्हणणे मला पटत नाही. देशाचा इतिहास बाबरापासून सुरु होतो तो आणि छापला जातो हे दुर्देव आहे. बाबरापूर्वी कोणी नव्हते का? या देशाकरिता झटणारा हा माझा मुसलमान आहे, त्यात मी भेदाभेद करत नाही. माझ्या दृष्टीने बाबासाहेब या देशाला कळले नाहीत, आंबेडकर मोठे व्यक्तिमत्त्व होते. त्यांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही.


देश कधीही हिरवा होणार नाही -
लाल बहादूर शास्त्री सोडून आतापर्यंत देशातील सर्व पंतप्रधानांना मी शंभराच्या खाली गुण देतो. पण त्यांची जयंती ही 2 ऑक्टोबर ला येते ती हेतुपुरस्सर पुसली जाते. त्याचा विसर पाडला जातो. किती वर्षे कारस्थान आहे? हा देश कधीही हिरवा होणार नाही हा देश भगवा राहिला पाहिजे. असं वक्तव्य गोखले यांनी केलं.


भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र यावी -
जे 70 वर्षात झालं नाही ते मोदींनी केलं, पक्षाचे काम सर्व करतात, पण ते देशासाठी मोदी चांगलं काम करतात. भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र आल्यास फार बरं होईल. मी कोणत्याही राजकीय पक्षाला बांधील नाही नव्हतो आणि नसेनही, असं वक्तव्य अभिनेते विक्रम गोखले यांनी केलं.