G20 Summit : 'एक विश्व, एक आरोग्य व्यवस्था' यासाठी सर्व देशांनी एकत्र यावं; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आवाहन
G20 Summit : कोरोना काळात अनेक संकटं आली तरी भारताने इतर देशांना दिलेल्या लस पुरवठ्याचं आणि वैद्यकीय साहित्याच्या पुरवठ्याचं आश्वासन पाळलं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अधोरेखित केलं.
G20 Summit : जगासमोर असलेल्या कोरोनाच्या संकटाला तोंड देण्यासाठी सर्वांनी एकत्रित यावं, One Earth, One Health (एक विश्व, एक आरोग्य व्यवस्था) हा दृष्टीकोन अंमलात आणावा असं मत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज G20 देशांच्या बैठकीला संबोधन केलं. भारताने कोरोना विरोधातील लढ्यामध्ये दिलेल्या महत्वपूर्ण योगदानाची माहिती त्यांनी दिली. भारताने आतापर्यंत 150 हून अधिक देशांना वैद्यकीय साहित्य आणि औषधांचा पुरवठा केला असल्याची माहितीही त्यांनी दिली.
या वर्षीची G20 देशांची बैठक ही इटलीतील रोममध्ये होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बैठकीच्या दरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांची भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदींची यंदाची ही आठवी बैठक आहे.
कोरोना काळात अनेक संकटं आली तरी भारताने इतर देशांना दिलेल्या लस पुरवठ्याचं आणि वैद्यकीय साहित्याच्या पुरवठ्याचं आश्वासन पाळलं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अधोरेखित केलं. जगाच्या सप्लाय चेनमध्ये विविधता आणण्यासाठी सर्व देशांनी मिळून प्रयत्न करावेत असंही पंतप्रधान मोदींनी सांगितलं. पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत भारतामध्ये कोरोना लसीचे पाच अब्ज डोस तयार होणार असून ते जगभरातील देशांना पुरवण्यात येतील असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
On the sidelines of the @g20org Rome Summit, PM @narendramodi interacts with various leaders. pic.twitter.com/7L3vbpRzUs
— PMO India (@PMOIndia) October 30, 2021
या दरम्यान मोदींनी पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली असून त्यांना भारत भेटीचं आमंत्रण दिलं आहे. आपण लवकरच भारताच्या दौऱ्यावर येऊ असं आश्वासन पोपनी पंतप्रधानांना दिलं आहे. पंतप्रधान मोदीं आणि पोप फ्रान्सिस यांच्या दरम्यान 20 मिनीटांची चर्चा झाल्याची माहिती परराष्ट्र सचिवांनी दिली.
G20 हा गट जगातल्या सर्वाधिक शक्तीशाली असलेल्या देशांचा एक गट आहे. हा गट सर्वात मोठा आर्थिक गट म्हणून ओळखला जातो. जागतिक अर्थव्यवस्थेच्या सुधारासाठी महत्वाच्या मुद्द्यांची चर्चा करण्यासाठी G20 हे सर्वात महत्वाचं व्यासपीठ मानलं जातं.
महत्वाच्या बातम्या :