असंघटित कामगारांसाठीच्या e-Shram कार्ड साठी नोंदणी करताय? अशी करा प्रक्रिया
असंघटित क्षेत्रातील 38 कोटी कामगारांना सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी e-Shram योजना सुरु केली आहे. कामगारांना याचे एक कार्ड देण्यात येणार असून त्यासाठी नोंदणी आवश्यक आहे.
मुंबई : केंद्रीय कामगार मंत्रालयाने गुरुवारी ई-श्रम (e-Shram) पोर्टल सुरु केलं आहे. त्या माध्यमातून देशातील जवळपास 38 कोटी असंघटित कामगारांची नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. देशातील असंघटित क्षेत्रातील कामगारांची संख्या मोठी असून त्यांना आता मुख्य प्रवाहात आणण्याचं काम सुरु आहे
देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच असंघटित क्षेत्रातील 38 कोटी कामगारांची नोंदणी करण्यात येणार असल्याचं केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी सांगितलं आहे. या पोर्टलच्या माध्यमातून देशातील बांधकाम क्षेत्रातील कामगार, स्थलांतरित मजूर, फेरीवाले, घर कामगार, रोजंदारी कामगार आणि इतर सर्व प्रकारच्या असंघटित कामगारांची नोंदणी करण्यात येणार आहे येणार आहे.
ई- श्रम पोर्टलवर नोंदणी कशी करणार?
1. सर्वप्रथम केंद्र सरकारच्या eshram.gov.in या अधिकृत वेबसाईटवर भेट द्या.
2. त्यानंतर 'Register on e-SHRAM' यावर क्लिक करा.
3. आपला आधार लिंक असलेला मोबाईल क्रमांक आणि समोर असलेला captcha code भरा आणि send OTP यावर क्लिक करा.
4. त्यानंतर सांगितल्याप्रमाणे प्रोसेस करा आणि आपली नोंदणी पूर्ण करा.
जर एखाद्या कामगाराचे आधार कार्ड मोबाईलला कनेक्ट नसेल तर जवळच्या कम्युनिटी सर्व्हिस सेंटरला भेट द्या आणि बायोमेट्रिक ऑथेन्टिकेशन प्रक्रिया पूर्ण करा. यानंतरही जर काही समस्या आली तर 14433 हा हेल्पलाईन क्रमांक देण्यात आला आहे. त्यावर कॉल करुन आपल्या समस्येचं निवारण करता येईल.
ही नोंदणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित कामगाराला 12 अंकी युनिक नंबर असलेले ई-श्रम कार्ड देण्यात येईल. त्याच्या मदतीने या कामगारांना सामाजिक सुरक्षेच्या सर्व योजनांच्या अंतर्गत आणण्यात येणार आहे.
अपघाती मृत्यू झाल्यास दोन लाखांचा विमा
ई-श्रम पोर्टलवर सर्व राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी असंघटित क्षेत्रातील कामगारांची नोंद करावी असं आवाहन केंद्र सरकारकडून करण्यात आलं आहे. ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केलेल्या कामगारांचा अपघाती मृत्यू झाल्यास केंद्र सरकारकडून त्यांच्या वारसांना दोन लाख रुपयांच्या विम्याचे कवच देण्यात येणार आहे. तसेच अपघातात कायमस्वरुपी अपंगत्व आल्यास एक लाख रुपयांची भरपाई देण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या :