आधी माफी मागा, मगच उत्तर प्रदेशात या; ब्रिजभूषण सिंह यांचा पुन्हा राज ठाकरेंना इशारा
BJP MP Warns Raj Thackeray: उत्तर प्रदेशचे भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना इशारा दिला आहे.
BJP MP Warns Raj Thackeray: उत्तर प्रदेशचे भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना इशारा दिला आहे. यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले आहेत की, जोपर्यंत राज ठाकरे आपला अहंकार सोडत नाहीत, तोपर्यंत त्यांच्यावर श्रीरामाची कृपा होणार नाही. जोपर्यंत त्यांचा अहंकार मोडत नाही, तोपर्यंत ते उत्तर भारतात येऊ शकणार नाही. ते पुढे म्हणाले की, अयोध्येतील रहिवासी असल्याची शिक्षा अयोध्येतील लोकांना भोगावी लागत आहे. अयोध्येत काही समस्या आहेत, मी काही दिवसांत सर्वांना भेटेन आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना याबाबत माहिती देईन.
ब्रिजभूषण सिंह म्हणाले की, खासदार असो, आमदार असो किंवा महापौर असो, त्यांची जबाबदारी अयोध्येतील जनतेप्रती असली पाहिजे. कोणत्याही विशिष्ट व्यक्तीप्रती नाही. मी कुणाच्या तरी कृपेने खासदार झालो आहे, असे या लोकांना वाटत आहे. मात्र कोणाच्या कृपने नाही तर जनतेच्या मतांनी मी खासदार झालो आहे. मी अशोक सिंघल, ऋषी संत आणि सरयू माता यांच्या साक्षीने पुन्हा एकदा स्प्ष्टपणे सांगतो की, मी अयोध्येतून निवडणूक लढवणार नाही आणि कोणी योग्य व्यक्ती निवडणूक लढवली तर मी त्याला मदत करेन, असे ते म्हणाले.
यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा राज ठाकरे यांना लक्ष्य करत म्हटलं आहे की, राज ठाकरे हे दुर्दैवी आहेत, जर ते समजूतदार असतील तर जनतेची माफी मागायला काहीच हरकत नव्हती. इतिहास आहे, मोठमोठ्या राजांनी महाराजांनी, सम्राटांनी, संतांनीही जनतेची माफी मागितली आहे. मी म्हणालो होतो की, जनतेकडून माफी मागा, संतांना विचारा, मोदीजींना विचारा किंवा योगीजींना विचारा. इतका दुर्दैवी कोण असू शकतो? राज ठाकरे घाबरले नाहीत, आम्ही राज ठाकरेंना रोखले नाही, त्यांच्या अहंकाराने राज ठाकरेंना अयोध्येत येण्यापासून रोखले आहे. जोपर्यंत त्यांचा अहंकार मोडत नाही, तोपर्यंत ते उत्तर भारतात पाऊल ठेवू शकणार नाहीत. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार होते. पण नंतर तब्येत बरी नसल्याचे सांगत त्यांनी हा दौरा रद्द केला. त्याचवेळी त्यांच्या दौऱ्याला भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी विरोध केला होता.