...अन् हवाई दलाच्या मदतीनं मध्यप्रदेश सरकारच्या सातपुडा भवनातील आग आटोक्यात; चौकशीसाठी समिती गठित
Bhopal Fire: मध्यप्रदेश सरकारच्या सातपुडा भवन प्रशासकीय इमारतीला भीषण आग. हवाई दलाच्या मदतीनं आग नियंत्रणात, चौकशीसाठी समिती गठित
Bhopal Fire Updates: भोपाळमधील (Bhopal Fire Updates) सचिवालयासमोर असलेल्या मध्यप्रदेश सरकारच्या (Madhya Pradesh Government) सातपुडा भवन (Satpura Bhawan) इमारतीला सोमवारी दुपारी चारच्या सुमारास भीषण आग लागली. आग तिसऱ्या मजल्यावर लागली होती, पण पाहता पाहता ती सहाव्या मजल्यापर्यंत पोहोचली. आग विझवण्याचे प्रयत्न अयशस्वी झाल्यावर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे हवाई दलाची (Air Force) मदत मागितली. तात्काळ हवाई दलाला पाचारण करण्यात आलं. एएन 32 विमाने आणि एमआय-15 हेलिकॉप्टर रात्रीच घटनास्थळी दाखल झालं आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू झाले. आगी एवढी भीषण होती की, हवाई दलालाही आगीवर नियंत्रण मिळवणं अवघड होत होतं. अखेर हवाई दलाच्या मदतीनं भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं.
सध्या आग नियंत्रणात आली असून अग्निशमन दलाकडून कुलिंह प्रोसेस सुरू आहे. भीषण आग कशामुळे लागली याचा शोध अग्निशमन दलाकडून घेतला जात आहे. अशातच आधी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आणि एसी कॉम्प्रेसरमध्ये झालेल्या स्फोटामुळे आग पसरली, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्याशी फोनवर चर्चा करून त्यांना माहिती दिली आणि आवश्यक मदत मागितली.
#WATCH | Firefighters engaged in the operation to douse the massive fire that broke out at the Satpura Bhawan building in Bhopal, Madhya Pradesh pic.twitter.com/oZjta09t8B
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) June 12, 2023
संपूर्ण कार्यालयातील 30 हून अधिक एसी कॉम्प्रेसरमध्ये स्फोट झाल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे. आगीचे कारण शोधण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी 4 सदस्यीय समिती स्थापन केली आहे. दुसरीकडे, गृहमंत्री नरोत्तम मिश्रा आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री विश्वास सारंग यांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. भोपाळचे पोलीस आयुक्त हरिनारायण चारी मिश्रा यांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा केला आहे.
मध्यप्रदेश सरकारच्या सातपुडा भवन इमारतीत अनेक विभागांची सरकारी कार्यालयं आहेत. आगीमुळे अनेक विभागातील सरकारी दस्तावेज जळून खाक झाले आहेत. चौथ्या मजल्यावर आरोग्य विभागाची तक्रार शाखा आहे. याठिकाणी ईओडब्ल्यू आणि लोकायुक्तातील कर्मचारी-अधिकारी यांच्या विरोधात केलेल्या तक्रारी आणि तपासाची कागदपत्रे ठेवण्यात आली होती, ती जळून खाक झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आगीवरुन काँग्रेसचा शिवराज सरकारवर निशाणा
मध्य प्रदेश सरकारच्या प्रमुख प्रशासकीय कार्यालयाला लागलेल्या भीषण आगीत अनेक महत्त्वाची कागदपत्रं आणि फर्निचर जळून खाक झाले असल्याची माहिती मिळत आहे. 30 हून अधिक एसींचा स्फोट झाल्याचं सांगण्यात येत आहे. आग लागण्याच्या वेळेवर काँग्रेसनं प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. शिवराज सरकारचा हा डाव असल्याचा आरोप काँग्रेसच्या वतीनं करण्यात आला आहे. त्यामुळे आग लावून घोटाळ्यांच्या फाईल्स जळून खाक झाल्याचाही आरोप काँग्रेसकडून केला जात आहे. त्याचवेळी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना आगीच्या घटनेची माहिती दिली आहे. आग विझवण्यासाठी त्यांनी हवाई दलाची मदत घेतली. संरक्षणमंत्र्यांनी हवाई दलाला तसे निर्देश दिले होते. संरक्षणमंत्र्यांच्या सूचनेनुसार, रात्री उशिरा एएन 32 विमाने आणि एमआय 15 हेलिकॉप्टर भोपाळला पाठवण्यात आले होते.
#WATCH | Madhya Pradesh: Morning visuals from Bhopal's Satpura Bhawan, where a major fire broke out yesterday pic.twitter.com/w6ShWnWwGu
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) June 13, 2023
हवाई दलाच्या मदतीनं आग आटोक्यात
मुख्यमंत्री शिवराज यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशीही फोनवर चर्चा केली. आग विझवण्यासाठी त्यांनी हवाई दलाची मदत घेतली. संरक्षणमंत्र्यांनी हवाई दलाला निर्देश दिले. संरक्षणमंत्र्यांच्या सूचनेनुसार एएन 32 विमाने आणि एमआय 15 हेलिकॉप्टर सोमवारी रात्री भोपाळला रवाना झाली. ही विमाने सातपुडा इमारतीच्या वरच्या भागातून एरोप्लेन बकेटच्या मदतीनं पाणी टाकून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं.