Fact Check : लसीकरणाच्या नावाखाली शरीरात इंजेक्ट करतायत मायक्रोचिप? सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल, दावा कितपत खरा?
Fact Check : लसीकरणाच्या नावाखाली केंद्र सरकार शरीरात इंजेक्ट करतंय मायक्रोचिप? सोशल मीडियावर हा दावा व्हायरल होत आहे. पण हा दावा कितपत खरा आहे? जाणून घ्या
Fact Check : सध्या देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. वाढणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येत काही अंशी दिलासा मिळाला असला तरी धोका मात्र अद्याप टळलेला नाही. सध्या कोरोनावरील उपाय म्हणून पाहिलं जात असलेल्या लसीकरण मोहीमेनंही देशात वेग धरला आहे. वैज्ञानिकांनिही कोरोना विरुद्धच्या लढाईतील सुरक्षा कवच म्हणजे, कोरोनावरील प्रभावी लस असं सांगितलं आहे. त्यामुळे देशातील प्रत्येक नागरिकाला लस मिळू शकेल म्हणून मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम चालवली जात आहे. दरम्यान, लसीकरण मोहीमेला सुरुवात झाल्यापासूनच काही अफवा पसरवण्यात येत आहेत. अशातच सध्या सोशल मीडियावर एक नवा दावा व्हायरल होत आहे. या दाव्यामध्ये सांगण्यात येत आहे की, सरकार लसीकरणाच्या बहाण्यानं लोकांच्या शरीरात मायक्रोचिप ट्रान्सप्लांट करत आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर या दाव्याशी निगडित अनेक व्हिडीओ सातत्यानं व्हायरल होत आहेत. या दाव्याची सत्यता पडताळून पाहण्याचा प्रयत्न एबीपी माझानं केला आहे. जाणून घेऊया सविस्तर...
सोशल मीडियावर व्हायरल होणारा दावा :
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये असा दावा केला जात आहे की, सरकार कोरोना लसीच्या बहाण्यानं लोकांच्या शरीरात मायक्रोचिप प्लांट करत आहे. सर्व नागरिकांना आपल्या ताब्यात ठेवता यावं, यासाठी सरकार या मायक्रोचिप नागरिकांच्या शरीरात प्लांट करत असल्याचं या व्हिडीओमध्ये सांगण्यात येत आहे.
सोशल मीडियावर केला जाणारा दावा कितपत खरा?
एबीपी माझाच्या सर्व पडताळणीतून मायक्रोचिप प्लांटबाबतचा दावा खरा ठरेल असं कोणतंही तथ्य समोर आलेलं नाही. लसीकरणाबाबत लोकांच्या मनात गैरसमज निर्माण करण्यासाठी ही अफवा पसरवण्यात आली आहे. तसेच केंद्र सरकारच्या वतीनं पासपोर्टसाठी लसीकरण करणं अनिर्वाय करण्यात आलं असल्याचाही मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. परंतु, पडताळणीत हा दावा देखील खोटा असल्याचं सिद्ध झालं आहे. यापूर्वीही सोशल मीडियावर अनेक अफवा पसरवण्यात आल्या होत्या. बिल गेट्स लोकांना नागरिकांचा बायोमॅट्रिक डाटा गोळा करण्यासाठी लसीकरण मोहीमेचा आधार घेत आहेत, असा दावाही लसीकरणाबाबत सोशल मीडियावरुन करण्यात आला होता. हा दावाही पडताणीत खोटा असल्याचं आढळून आलं होतं.
दरम्यान, कोरोना विरुद्धच्या लढाईत गती आणण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीनं लसीकरण मोहीम अधिक वेगवान करण्यासाठी अनेक गोष्टी राबवल्या आहेत. लसीकरणाच्या रजिस्ट्रेशनसाठी वापरण्यात येणाऱ्या कोविन पोर्टलवरील अनिर्वायता देखील काढून टाकली आहे. यामागील मुख्य हेतू म्हणजे प्रत्येक व्यक्तीचं लसीकरणं लवकरात लवकर व्हावं हाच आहे.
अशातच एबीपी माझाही वाचकांना आवाहन करत आहे की, कोरोना विरुद्धच्या लढ्यात सहभागी होण्यासाठी कोणत्याही व्हायरल मेसेजवर विश्वास न ठेवता. लस घ्या आणि सुरक्षित राहा.
महत्त्वाच्या इतर बातम्या :