Air India Flight : एअर इंडियाच्या विमानात आग, 175 प्रवासी होते उपस्थित; दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळावर आपत्कालीन परिस्थिती घोषित
Air India Flight : दिल्लीहून बंगळूरुला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला सायंकाळी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आग लागली. त्यानंतर संपूर्ण विमानतळावर आपत्कालीन परिस्थिती घोषित करण्यात आली.
Air India Flight : दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन (Indira Gandhi International Airport) बंगळुरच्या दिशेने एका विमानाने उड्डाण केलं. त्याचवेळी विमानात अचानक फायर अलार्म वाजण्यास सुरुवात झाली. त्यावेळीच पायलने तात्काळ एअर इंडियाचे (Air India) फ्लाइट क्रमांक AI-807 परत दिल्ली विमानतळाच्या दिशेने वळवले आणि दिल्ली विमानतळावर त्या फ्लाईटचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. तपासादरम्यान विमानात छोटी आग लागल्याचे समोर आले आहे. यावेळी विमानात एकूण 175 प्रवासी असल्याची माहिती समोर आलीये.
रिपोर्ट्सनुसार, एअर कंडीशनिंग युनिटमध्ये आग लागल्याची शंका होती. त्यानंतर आता संपूर्ण विमानतळावर आपत्कालीन परिस्थिती देखील घोषित करण्यात आली. एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, या विमानातून बंगळुरुसाठी प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांसाठी दुसरी व्यवस्था करण्यात आली आहे.
नेमकं काय घडलं?
एएनआयने दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अधिकाऱ्यांच्या हवाल्याने या घटनेला दुजोरा दिला आहे.एअर इंडियाचे फ्लाइट क्रमांक AI-807 शुक्रवारी संध्याकाळी दिल्ली विमानतळावरून टेकऑफ झाल्याचं या अहवालात म्हटलं आहे. टेक ऑफ करण्यापूर्वी विमानाची संपूर्ण सुरक्षा आणि तांत्रिक तपासणी करण्यात आली. पण त्यावेळी विमानात कोणताही दोष आढळला नाही. त्यानंतर संध्याकाळी 5.52 च्या सुमारास या विमानाने उड्डाण केलं. उड्डाण होताच, पायलटजवळील फायर सिग्नल्सने इशारा देण्यास सुरुवात केली.पायलटने विमान वळवले आणि एअर ट्रॅफिक कंट्रोलला याबद्दल माहिती दिली.या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून एअर ट्रॅफिक कंट्रोलने विमानाच्या इमर्जन्सी लँडिंगला परवानगी दिली. यानंतर वैमानिकाने संध्याकाळी 6.38 वाजता विमान सुरक्षितपणे दिल्ली विमानतळावर उतरवले.
एअर कंडिशनिंग युनिटमध्ये लागली आग
विमानाच्या इमर्जन्सी लँडिंगनंतर लगेचच 175 प्रवाशांना खाली उतरवून वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले. यानंतर विमानाची पुन्हा कसून तपासणी करण्यात आली. या तपासणीत विमानाच्या एअर कंडिशनिंग युनिटमध्ये छोटी आग लागल्याचे समोर आले आहे. विमानाची संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
डीजीसीएला दिली घटनेची माहिती
विमानतळाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या संपूर्ण प्रकरणाची माहिती नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाला (डीजीसीए) देण्यात आली आहे. सध्या डीजीसीएकडून कोणतेही वक्तव्य आलेले नाही, मात्र त्यांच्याकडून या घटनेचा सविस्तर अहवाल मागवला जाईल, असं म्हटलं जात आहे. विमानाचे सेफ्टी ऑडिटही केले जाणार असल्याचं म्हटलं जात आहे.
ही बातमी वाचा :
युट्यूबवर पाहून घरातच छापल्या लाखोंच्या बनावट नोटा; 9 वी नापास 26 वर्षीय तरुणाला बेड्या