मुंबई : मुस्लिम बांधवांसाठी पवित्र असलेल्या ईद-अल-अजहा म्हणजेच बकरी ईदचा सण आज देशभरात उत्साहाने साजरा केला जात आहे. मुस्लिम समाजामध्ये कुर्बानीला मोठं महत्व असून त्यासाठीच आजचा दिवस साजरा केला जात आहे. इस्लामिक कॅलेंडरनुसार, रमजाननंतर जवळपास दोन महिन्यानंतर बकरी ईद साजरी केली जाते. 


कुर्बानीला महत्व
ईद-अल-अजहा या दिवसाला केवळ भारतातच बकरी ईद या नावाने ओळखलं जातं. आजच्या दिवशी, बकरी ईदच्या निमित्ताने बकऱ्याची कुर्बानी देण्याची प्रथा आहे. या धार्मिक प्रक्रियेला फर्ज-ए-कुर्बान असं म्हटलं जातं. 


इस्लामिक कॅलेंडरनुसार, या वर्षी आज म्हणजे  21 रोजी बकरी ईद साजरी करण्यात येत आहे. त्या निमित्ताने ईदगाह आणि प्रमुख मशिदींमध्ये ईद-अल-अजहा च्या विशेष नमाजाचे पठण करण्यात येणार आहे. या नमाजाची वेळ ही सकाळी 6 ते 10.30 अशी आहे. पण गेल्या वर्षी प्रमाणेच या वर्षीही कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हा सण साजरा करण्यासाठी निर्बंध असून लोकांनी नमाज पठण आपापल्या घरीच करावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.  


बकरी ईदचे महत्व
रमजानच्या पवित्र महिन्यानंतर 70 दिवसांनी बकरी ईदचा सण साजरा करण्यात येतो. या सणाला ईद-अल-अजहा किंवा ईद-उल-जुहा असंही म्हटलं जातं. आजच्या दिवशी नमाज पठण केल्यानंतर बकऱ्याची कुर्बानी दिली जाते. या दिवशी गरीब लोकांना जेवण दिलं जातं. या कुर्बानीची तीन हिस्स्यांमध्ये विभागणी केली जाते. एक हिस्सा गरीबांना, दुसरा हिस्सा मित्रांना, नातेवाईकांना आणि तिसरा हिस्सा हा स्वत:कडे ठेवला जातो. 


हजरत इब्राहिम हे अल्लाहाचे अनुयायी मानले जातात. त्यांची खूप कठीण परीक्षा घेण्यात आली होती. अल्लाहाने  इब्राहिम यांनी त्यांच्या मुलाची म्हणजे हजरत इस्माईलची कुर्बानी देण्यासाठी सांगितलं होतं. त्या आदेशाचा पालन करण्यासाठी इब्राहिम तयार झाले, पण स्वत:चा मुलगा असल्याने त्यांनी आपल्या डोळ्यावर पट्टी बांधली. कुर्बानी दिल्यानंतर डोळ्याची पट्टी उघडल्यानंतर त्यांना दिसलं की कुर्बानी एका बकऱ्याची देण्यात आली आहे, त्यांचा मुलगा सुरक्षित ठेऊन अल्लाहाने त्यांच्यावर कृपा केली आहे. त्या दिवसाचे स्मरण म्हणून मुस्लिम बांधवांत बकरी ईद साजरी केली जाते. 


महत्वाच्या बातम्या :