Sero Survey India : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका समोर असताना सेरो सर्वेमध्ये महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या सर्वेक्षणात सामील झालेल्या 67.6 टक्के लोकांमध्ये  कोविड अॅन्टीबॉडीज आढळल्या आहेत. तर जवळपास निम्या लहान मुलांमध्ये अँटीबॉडीज आढळल्या आहेत.


इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) मंगळवारी चौथ्या सेरो सर्वेक्षणाची आकडेवारी जाहीर केली. हे सर्वेक्षण जून-जुलै दरम्यान करण्यात आले होते. 28,975 लोकांवर केलेल्या या सर्वेक्षणात 6 ते 17 वयोगटातील मुलांचा देखील समावेश होता. या सर्वेक्षणात सामील झालेल्या 67.6 टक्के लोकांमध्ये  कोविड अॅन्टीबॉडीज आढळल्या आहेत. म्हणजेच 67.6 टक्के लोकांना कोरोना संसर्ग झाला होता. त्यामुळे लोकसंख्येचा विचार केला तर अजूनही 40 कोटी लोकांमध्ये अद्यापही अँटीबॉडीज तयार झालेल्या नाहीत. म्हणजे या 40 कोटी नागरिकांना कोरोनाचा धोका कायम आहे.


या सर्वेक्षणात सामील झालेल्या 28,975  लोकांमध्ये 6 ते 9 वर्षे वयोगटातील 2,892 मुले, 10 ते 17 वर्षे वयोगटातील 5,799 मुले आणि 18 वर्षांवरील 20,284 लोकांचा समावेश आहे. आयसीएमआर महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी सेरो सर्व्हेचे निकाल जाहीर करताना सांगितले की, सेरो सर्वेनुसार देशातील दोन तृतीयांश लोकसंख्येत कोविड अँटीबॉडीज असून अजून 40 कोटी लोकसंख्येला कोरोनाचा धोका असल्याचे सर्वेक्षणात उघड झाले आहे. सर्वेक्षणात समाविष्ट 6 ते 17 वर्षे वयोगटातील अर्ध्याहून अधिक मुलांमध्ये अँटीबॉडीज देखील आढळली आहेत. म्हणजेच दुसऱ्या लाटेच्या संसर्गाचा परिणाम मुलांवरही झाला आहे.


सेरो सर्वेच्या आकडेवारीनुसार देशातील जवळपास 50 टक्क्यांहून अधिक लहान मुलांमध्ये अँटिबॉडिज आढळल्या आहेत. त्यामुळे या 50 टक्के मुलांना कोरोना होऊन गेल्याचं यातून सिद्ध होत आहे. मात्र अद्यापही 50 टक्के मुलांना कोरोनाचा धोका कायम आहे. 


सेरो सर्वेतील महत्त्वाची माहिती



  • वयोगटानुसार 6 ते 9 वर्षाच्या 57.2 टक्के, 10 ते 17 वर्षांत 61.6 टक्के, 18 ते 44 वर्षांत 66.7 टक्के, 45 ते 60 वयोगटात 76.7 टक्के आणि 60 वर्षांवरील 76.7 टक्के लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. 

  • पुरुषांना 65.8 टक्के आणि 69.2 टक्के महिलांना संसर्ग झाला आहे.

  • ग्रामीण भागात 66.7 टक्के आणि शहरी भागात 69.6 टक्के लोकांमध्ये संसर्ग आढळला आहे.

  • 12 हजार 607 लोकांना लस दिली गेली नव्हती आणि त्यामध्ये 62.3 टक्के लोकांमध्ये अँटीबॉडीज आढळल्या आहेत.

  • 6 ते 17 वर्षात 50 टक्के सेरो पॉझिटिव्ह.

  • 40 कोटी लोकांमध्ये अद्याप अँटीबॉडीज नाहीत.

  • 5038 लोकांनी लस घेतली होती आणि त्यामध्ये 81 टक्के लोकांमध्ये अँटीबॉडीज आढळल्या. 

  • 2631 लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले होते, ज्यामध्ये 89 टक्के लोकांमध्ये अँन्टीबॉडीज आढळल्या आहे.

  • आरोग्य सेवक मोठ्या प्रमाणात संक्रमित झाले आहेत. सेरो सर्व्हेच्या माहितीच्या आधारे 85.3 टक्के आरोग्य सेवा कामगारांना संसर्ग झाला आहे. यापैकी 10.5 टक्के आरोग्यसेवा कर्मचार्‍यांनी लस घेतली नाही. तर 13.4 टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांनी पहिला डोस आणि 24.1 टक्के लोकांनी दुसरा डोस घेतला.