IND vs SL : टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात तीन विकेटने विजय मिळवला आहे. दुसरा सामना जिंकत टीम इंडियाने मालिकाही खिशात घातली आहे. श्रीलंकेने दिलेल्या 275 धावांचा पाठलाग करताना एक वेळ अशी होती की भारताची जिंकण्याची आशा मावळली होती. 197 वर 7 गडी बाद असल्यामुळे श्रीलंकेचं पारडं जड होतं. मात्र दीपक चहर आणि भुवनेश्वर कुमारची खेळी निर्णायक ठरली. दोघांनी 84 धावांची अभेद्य पार्टनरशीप केली. 


श्रीलंकेने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. मागील सामन्यात मॅन ऑफ द मॅच ठरलेला पृथ्वी शॉ अवघ्या 13 धावा करुन बाद झाला. त्यानंतर आलेला ईशान किशनही एक धाव करुन बाद झाला. त्यानंतर कर्णधार शिखर धवनही 29 धावा करुन बाद झाला. शिखर धवननंतर सूर्यकुमार यादव आणि मनिष पांडेने टीम इंडियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र मनिष पांडे 37 धावांवर रनआऊट झाला. मनिषनंतर आलेला हार्दिक पांड्याही खातं न उघडताच तंबूत परतला. त्यानंतर अर्धशतक साजरं करुन सूर्यकुमार यादवही बाद झाला. त्याने 53 धावा केल्या. आता कृणाल पांड्यावर भारताच्या खेळाची धुरा उरलेली असताना तोही 35 धावांवर बाद झाला. त्यामुळे भारताने हा सामना गमावला अशी स्थिती असताना दीपक चहर आणि भुवनेश्वर कुमारने जबाबदारीने खेळी करत टीम इंडियाला विजयापर्यंत नेले. दोघांनी आठव्या विकेटसाठी नाबाद 84 धावांची नाबाद खेळी केली. यात दीपक चहरने 69 धावांची आणि भुवनेश्वर कुमारने 19 नाबाद धावांची खेळी केली. 


श्रीलंकेचा डाव


त्याआधी चरिथ असलांकाने 65 धावा आणि अविष्का फर्नांडो 50 धावांची शानदार खेळी करत भारतासमोर 276 धावांचं लक्ष्य ठेवलं. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने फलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे संघाने 50 षटकांत 9 बाद 275 धावा केल्या. भारताकडून भुवनेश्वर कुमार आणि युजवेंद्र चहलने प्रत्येकी तीन गडी बाद केले आणि दीपक चहरने दोन गडी बाद केले.


मिनोद भानुकासह फर्नांडोने पहिल्या विकेटसाठी 77 धावांची पार्टनरशीप केली. ही पार्टनरशीप चहलने मिनोदला बाद करून ब्रेक केली. मिनोद 36 धावा करुन बाद झाला. दुसर्‍या बॉलवर चहलने भानुका राजपक्षेला शुन्यावर बाद केले. त्यानंतर फर्नांडोने अर्धशतक पूर्ण केले, परंतु त्यानंतर तो जास्त क्रिजवर टिकू शकला नाही. भुवनेश्वरने त्याला बाद केले. त्यानंतर चहरने धनंजय डी सिल्वाला 32 धावांवर बाद करून श्रीलंकेला चौथा धक्का दिला. यानंतर चहलने कर्णधार दासुन शनाकाला 16 धावांवर बाद केले.


त्यानंतर श्रीलंकेचा डाव गडगडला. वनिंदू हसरंगा, दुश्मंथ चामिरा पटापट बाद झाले. चमिका करुणरत्ने 33 चेंडूंत पाच चौकारांच्या मदतीने 44 धावांची नाबाद खेळी केली. तर कासुन रजिथा एक धाव करुन नाबाद राहिला.