पंढरपूर : आषाढी एकादशी दिवशी पंढरपूर शहरातील 195 स्थानिक वारकरी महाराज मंडळींना दर्शन दिल्यानंतर पंढरपूरकडे आलेल्या मानाच्या 10 पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांनी आजच दर्शनाची मागणी करीत मंदिर परिसरात गर्दी केल्याने प्रशासनाचा गोंधळ उडाला. यानंतर पालखी सोहळा प्रमुख आणि मंदिर प्रशासन यांच्यामध्ये झालेल्या बैठकीत तोडगा निघाल्याने हे वारकरी परतले. मात्र, दोन ते तीन तास शेकडो वारकऱ्यांनी उत्तर दरवाजासमोर गर्दी केल्याने संचारबंदी आणि कोरोना नियमांचे तीनतेरा वाजले होते.
मानाच्या 10 पालखी सोहळे पादुकांसह पौर्णिमेला विठ्ठलाच्या भेटीला जातात यावेळी पालखी सोबतच्या वारकऱ्यांना देवाचे दर्शन देण्याची प्रथा आहे. मात्र, या वारकऱ्यांना नेमका कोणी निरोप दिला हेच समजले नसले तरी शेकडो वारकरी अचानक मंदिराजवळ आल्याने प्रशासन गोंधळात पडले. अखेर मंदिर समिती कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, प्रांताधिकारी सचिन ढोले आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी पालखी सोहळा प्रमुख विकास ढगे, संत तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रमुख संजय मोरे आणि इतर मान्यवरांशी चर्चा केल्यावर तोडगा निघाला. आता प्रशासन शासनाशी चर्चा करून निर्णय कळवणार असल्याचे माऊली पालखी सोहळा प्रमुख विकास ढगे यांनी सांगितले. यानंतर मात्र विठ्ठलाचा जयघोष करीत सर्व पालखी सोहळ्यातील जमलेले वारकरी विठ्ठल मंदिराला प्रदक्षिणा घालून मठांमध्ये परतले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सपत्निक विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणी यांची शासकीय महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाली. यावेळी विठुमाऊलीच्या जयघोषात मंदिराचा गाभारा दुमदुमून गेला. पहाटे 3 वाजून 40 मिनिटांनी विठ्ठल-रखुमाई यांची शासकीय महापूजा सपंन्न झाली. यंदा मानाचे वारकरी म्हणून कोलते दाप्त्यांना मान मिळाला. त्यांनी आज पहाटे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत विठ्ठलाची महापूजा केली.
दरवर्षी लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत होणारा आषाढी एकादशीचा सोहळा गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला. आषाढीच्या निमित्ताने विठ्ठल-रखुमाईची महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक केली. यावेळी रश्मी ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. यंदा मानाचा वारकरी म्हणून विठ्ठल मंदिरातील विणेकरी केशव शिवदास कोलते व त्यांच्या पत्नी इंदुमती कोलते यांना मान मिळाला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोलते दाम्पत्याचा सत्कार केला गेला.