मुंबई : राज्यात दैनंदिन कोरोना (Maharashtra corona cases) बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून दहा हजारांच्या आत येऊ  लागली आहे. आज 6, 910  नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 7 हजार 510 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 60 लाख 911 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.33 टक्के आहे. 


राज्यात आज 147 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.04 टक्के झाला आहे. तब्बल 41 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या  94, हजार 593 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जालना (29), हिंगोली (41), यवतमाळ (15), गोंदिया (57) या चार जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 15, 042 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 


मालेगाव, हिंगोली, अकोला, यवतमाळ, गोंदिया, चंद्रपूर  आज शून्य रुग्ण आढळले आहेत. तर कोल्हापुरात सर्वाधिक 685 रुग्णांची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,58,46,165 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 62,29, 596 (13.59 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5,60,354 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 3,977 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 


मुंबईत गेल्या 24 तासात 351 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद


मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना नियंत्रणात असल्याचं पाहायला मिळत आहे.   मुंबईत गेल्या 24 तासात 351 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 525 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,07,654 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 7,012 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1063 दिवसांवर गेला आहे.