Indigo Flight Emergency Landing: दुबई-मुंबई इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये आपत्कालीन लँडिंग, कार्गो कंपार्टमेंटमधून धूर येताच पायलटचा निर्णय, विमानात 194 प्रवासी
Indigo Flight Emergency Landing: राजकोट विमानतळावर आपत्कालीन लँडिंगची माहिती मिळताच, अग्निशमन दलाची दोन वाहने आणि राजकोट महानगरपालिकेच्या दोन रुग्णवाहिका तात्काळ विमानतळावर दाखल झाल्या

दुबईहून मुंबईला येणाऱ्या इंडिगो फ्लाइट IGO1452 ने राजकोट विमानतळावर आपत्कालीन लँडिंग केले. मिळालेल्या माहितीनुसार, पायलटने विमानाच्या कार्गो कंपार्टमेंटमधून धूर येत असल्याचे लक्षात आल्यानंतर विमानाने राजकोटमध्ये लँडिंग केले. इंडिगोच्या या विमानात पायलट आणि क्रूसह 194 प्रवासी होते. विमानतळ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, विमानातील सर्व प्रवासी आणि क्रू सदस्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.
विमानतळावर अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका दाखल
राजकोट विमानतळावर आपत्कालीन लँडिंगची माहिती मिळताच, अग्निशमन दलाची दोन वाहने आणि राजकोट महानगरपालिकेच्या दोन रुग्णवाहिका तात्काळ विमानतळावर दाखल झाल्या. अग्निशमन दलाचे जवान आणि डॉक्टर सज्ज ठेवण्यात आले होते. सीआयएसएफ (CISF) आणि विमानतळ पोलिसांसह इतर कर्मचारीही दाखल झाले. पोलिसांचे बॉम्ब निकामी करणारे पथक आणि श्वान पथकही घटनास्थळी दाखल झाले.
#WATCH | Rajkot, Gujarat: An IndiGo flight operating from Dubai to Mumbai made an emergency landing at Rajkot airport after smoke was detected in cargo hold area. The aircraft landed safely, and all passengers are safe: Rajkot Airport Director Diganta Borah
— ANI (@ANI) July 27, 2026
(Outside visuals from… https://t.co/qDfNHN5HL8 pic.twitter.com/lEUuQRLmUG
दुपारी 3:27 वाजता लँडिंग
राजकोट विमानतळाचे संचालक दिगंत बोरा यांनी सांगितले की, विमानाच्या कार्गो कंपार्टमेंटमधून धूर येत असल्यामुळे दुपारी 2:45 वाजता संपूर्ण आणीबाणी जाहीर करण्यात आली. त्यानंतर विमान दुपारी 3:27 वाजता राजकोट विमानतळावर उतरले. विमानातील सर्व 194 प्रवासी सुरक्षित आहेत.
आपत्कालीन लँडिंगच्या दोन पूर्वीच्या घटना...
15 जून: इंडिगो विमानाचे जयपूरमध्ये आपत्कालीन लँडिंग
दिल्लीहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानातील एका प्रवाशाची प्रकृती बिघडली. प्रवाशाची प्रकृती पाहून, पायलटने तात्काळ वैद्यकीय आणीबाणी जाहीर केली आणि जयपूर विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्याचा निर्णय घेतला. इंडिगो फ्लाइट 6E-322 दिल्लीहून मुंबईसाठी निघाले होते. प्रवासादरम्यान एका प्रवाशाची प्रकृती बिघडली. क्रूने प्रवाशाला प्रथमोपचार दिले, परंतु त्याच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने, एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) शी संपर्क साधण्यात आला आणि जवळच्या विमानतळावर उतरण्याची परवानगी मागण्यात आली.
12 मे: दिल्लीत आपत्कालीन लँडिंग
बंगळूरुहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाइट AI2802 ने दिल्लीत आपत्कालीन लँडिंग केले. विमान हवेत असताना, कॉकपिटमधील कर्मचाऱ्यांना एका इंजिनला आग लागल्याचा इशारा मिळाला. त्यानंतर विमान रात्री सुमारे 9:30 वाजता दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, विमानात अंदाजे 171 प्रवासी होते. सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित आहेत. विमान ओढून नेण्यात आले.
इतर महत्वाच्या बातम्या






















