Coronavirus : दक्षिणपूर्व आशिया आणि युरोपीय देशांमध्ये कोरोना विषाणूचा पादूर्भाव वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया (Dr Mansukh Mandaviya)  यांनी बुधवारी उच्चस्तरीय बैठक घेतली आहे. नीती आयोगाचे डॉ. व्हीके पॉल, एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया आणि आरोग्य सचिव या बैठकीला उपस्थित होते.


एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, डॉ. मनसुख मांडविया यांनी या बैठकीत दक्षता, आक्रमक जीनोम सिक्वेन्सिंग आणि परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. याबरोबरच कोविड-19 लसीकरण कार्यक्रम आणि 27 मार्चपासून आंतरराष्ट्रीय प्रवासी उड्डाणे पुन्हा सुरू करण्याबाबतही   डॉ. मनसुख मांडविया यांनी आढावा घेतला. चीन, सिंगापूर, हाँगकाँग, व्हिएतनाम आणि काही युरोपीय देशांमध्ये कोरोनाच्या रूग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी ही बैठक घेतली. 






आरोग्य सचिव राजेश भूषण, जैवतंत्रज्ञान विभागाचे सचिव डॉ. राजेश गोखले, फार्मास्युटिकल विभागाचे सचिव एस अपर्णा, नीती आयोगाचे सदस्य व्ही के पॉल, आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव आणि एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांच्यासह वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते.  


दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णांच्या संख्येत घट होत होती. परंतु, अलिकडे कोरोना रुग्णसंख्येत अचानक वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात देशात 2 हजार 876 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 98 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. काल देशात 2 हजार 568 कोरोना रुग्णांची नोंद झाली होती, तर 97 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. आज कोरोना रुग्णांच्या संख्येत 12 टक्क्यांची वाढ झाली आहे.


महत्वाच्या बातम्या