मुंबई : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत सर्वाधिक पाच लाखांहून अधिक मते घेणाऱ्या कुणाल राऊत यांची आज प्रदेशाध्यक्ष पदी निवड घोषित करण्यात आली.अखिल भारतीय युवक कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी.व्ही. यांनी जारी केलेल्या पत्राद्वारे राऊत यांची नियुक्ती आज जाहीर करण्यात आली.
कुणाल राऊत यांची युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड जाहीर झाल्यामुळे काँग्रेसमध्ये राज्यभरात आणि नागपुरात आनंदाचे वातावरण आहे. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाके उडवून व मिठाई वाटप करून राज्यभर आनंद साजरा केला. युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी चांगलीच चुरस बघायला मिळाली होती.
कुणाल राऊत यांना निवडणुकीत सर्वाधिक 5,48,267 मते मिळाली होती. त्यांचे प्रतिस्पर्धी शिवराज मोरे यांना 3,80,367 तर शरण बसवराज पाटील यांना 2,46,695 मते मिळाली होती. त्यामुळे राऊत यांच्या नावाची केवळ औपचारिक घोषणा उरली होती. त्यामुळे त्यांच्या नियुक्तीची केवळ औपचारिक घोषणा उरली होती. सत्यजीत तांबे यांच्या महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपला आहे,
कुणाल राऊत अल्प परिचय
कुणाल राऊत हे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे पुत्र असून त्यांचा जन्म 17 फेब्रुवारी 1989 रोजी झाला. विद्यार्थी दशेतच त्यांनी राजकारण आणि समाजकारण यात रस घेण्यास सुरुवात केली. संकल्प या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी समाजकार्यास प्रारंभ केला. त्यानंतर काँग्रेसच्या एनएसयुआय या विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी संघर्ष सुरू केला. एन.एस. यु.आय.चे नागपूर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून त्यांनी 2009 पासून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर ते सलग दोनदा निवडणुकीच्या माध्यमातून युवक काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून निवडून आले. तसेच 2018 च्या युवक काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीत ते युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून निवडून आले.
मतदारांचा विश्वास सार्थ ठरवेल : कुणाल राऊत
युवक काँग्रेसच्या युवा मतदारांनी व राज्यातील युवा शक्तीनी माझ्यावर जो विश्वास दाखविला तो मी सार्थ करून दाखवेल, अशा शब्दात कुणाल राऊत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मला मतदान करणाऱ्या सर्व मतदारांचा आणि माझ्या निवडणुकीत मला सहकार्य करणाऱ्या सर्वांचा मी आयुष्यभर ऋणी राहील,अशा शब्दांत त्यांनी आपली कृतज्ञता व्यक्त केली.