नवी दिल्ली : राहुल गांधींनी (Rahul Gandhi) काही काळ पूर्णपणे पक्षापासून दूर राहावं ही कुठल्या विरोधी पक्षाची टीका नाही तर ही मागणी काँग्रेसमधल्याच नाराज जी 23 गटाची आहे. पाच राज्यांच्या निकालानंतर या गटाच्या बैठकांना वेग आला आहे. अवघ्या पाच दिवसांत हे नेते आज दुस-यांदा भेटणार आहेत.  याआधीही जी 23 गटाचे नेते नेतृत्वबदलाबाबत आवाज उठवत आले. पण यावेळची त्यांची भाषा ही अधिक थेट आणि रोखठोक आहे. गांधी कुटुंबानं इतर नेत्यांसाठी वाट करुन द्यावी असं सिब्बल जाहीरपणे म्हणत आहेत. शिवाय खासगीत बोलतानाही यातले काही नेते राहुल गांधींनी आता पूर्णपणे काही काळ दूर राहावं, त्याशिवाय काही होणार नाही असं म्हणत आहेत. 


सोनिया गांधींनी पाच राज्यांच्या निवडणुकीत एकही सभा घेतली नाही. ही सभा घेतली नाही की त्यांना घेऊ दिली नाही याबद्दलही जी-23 गटाचे नेते खासगीत सवाल उपस्थित करत आहेत. सोनिया गांधींची प्रकृती ठीक नाही, पण काही दिवसांपूर्वी जयपूरमधल्या काँग्रेस मेळाव्यात हजेरी लावली होती. तशीच त्यांनी एखादी सभा का नाही घेतली असा त्यांचा सवाल आहे. शिवाय जर इतकी प्रकृती ठीक नसेल तर त्यांच्याकडे अध्यक्षपद राहू देणं योग्य आहे का असाही प्रश्न हे नेते उपस्थित करत आहेत. 


 महाराष्ट्रातून पृथ्वीराज चव्हाण हे एकमेव नेते आहेत जे जी 23 गटाचे सदस्य आहेत. याआधी मुकूल वासनिक यांचंही नाव या गटात घेतलं जात होतं. पण नंतर काँग्रेसच्या रचनेत मुकुल वासनिक यांना सामावून घेतलं गेलं. वासनिक यांना काँग्रेसच्या संघटन महासचिव पदाची जबाबदारी दिली गेली. शिवाय सोनिया गांधींना दैनंदिन कामकाजात मदत म्हणून जी तीन सदस्यीय सल्लागार समिती नेमली गेली त्यातही मुकूल वासनिक आहेत. त्यामुळे आता ते या बैठकांना हजर राहत नाहीत.


  पाच राज्यांच्या निराशाजनक निकालानं काँग्रेस पूर्णपणे हादरून गेली आहे. कालच यूपी, उत्तराखंड, गोवा, मणिपूर, पंजाब या पाचही राज्यातल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे राजीनामे तातडीनं घेतले गेले. त्यात आता जी 23 गटाच्या विरोधाची धारही वाढत चालली आहे. त्यामुळे या सगळ्या घडामोडी काँग्रेसला कुठे घेऊन जाणार, काँग्रेस अभेद्य राहणार की फुटणार या चर्चांना त्यामुळे सुरुवात झाली.