Donald Trump : ट्रम्प यांना पदावरुन हकलण्यात येणार? जाणून घ्या अमेरिकेच्या संविधानात काय लिहिलंय?
Donald Trump Impeachment : अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष, उपराष्ट्राध्यक्ष आणि सर्व उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना देशद्रोह भ्रष्टाचार किंवा गंभीर गुन्हा सिद्ध झाल्यास पदावरून हटवले जाऊ शकते.

Donald Trump Impeachment News : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप (Donald Trump) यांनी जगभरातल्या अनेक देशांवर मोठा टॅरिफ लावला आहे. भारतावरही त्यांनी 50 टक्के टॅरिफ (Tariff) लावला आहे. या निर्णयामुळे जागतिक पातळीवर मोठी खळबळ उडाली आहे. याचा थेट परिणाम भारताच्या जवळपास दोन-तृतीयांश एक्सपोर्ट (Export) वर होऊ शकतो. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेत पुन्हा एकदा ट्रम्प यांच्या पदावरून हकालपट्टीबाबत राजकीय चर्चा रंगू लागली आहे. मग खरेच ट्रम्प यांना पदावरून हटवणे शक्य आहे का? याबाबत अमेरिकेतील संविधानात काय तरतूद आहे हे पाहुयात.
संविधानात महाभियोगाची तरतूद
अमेरिकेच्या संविधानातील कलम II, सेक्शन 4 नुसार राष्ट्राध्यक्ष, उपराष्ट्राध्यक्ष आणि सर्व उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना देशद्रोह (Treason), भ्रष्टाचार (Corruption) किंवा गंभीर गुन्हा सिद्ध झाल्यास पदावरून हटवले जाऊ शकते. यालाच आपण महाभियोग (Impeachment) असे म्हणतो.
महाभियोगाची प्रक्रिया दोन टप्प्यांत
पहिला टप्पा: हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज (House of Representatives) मध्ये चौकशी आणि मतदान.
दुसरा टप्पा: बहुमताने ठराव मंजूर झाल्यानंतर प्रकरण सीनेट (Senate) मध्ये जाते.
सीनेटमध्ये दोन-तृतीयांश बहुमत आवश्यक
सीनेटमध्ये सुनावणी झाल्यानंतर, जर दोन-तृतीयांश खासदारांनी ट्रम्प दोषी असल्याचे मान्य केले, तर त्यांना पदावरून हटवले जाऊ शकते. मात्र, ही प्रक्रिया केवळ कायद्यापुरती मर्यादित नसून त्यामागे राजकीय पाठबळ (Political Support) आवश्यक असते.
आधीचे राष्ट्राध्यक्ष आणि महाभियोग
अमेरिकेच्या इतिहासात आतापर्यंत तीन राष्ट्राध्यक्षांवर महाभियोग चालवण्यात आला आहे -
अँड्र्यू जॉन्सन (Andrew Johnson)
बिल क्लिंटन (Bill Clinton)
डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) – दोन वेळा
मात्र, सीनेटमध्ये कोणत्याही राष्ट्राध्यक्षाविरुद्ध दोन-तृतीयांश बहुमत न मिळाल्यामुळे त्यांना हटवता आले नाही.
थोडक्यात सांगायचे झाले, तर अमेरिकेत ट्रम्प यांना पदावरून हटवणे कायदेशीर दृष्ट्या शक्य असले तरी त्यासाठी संविधानाने घालून दिलेले कठोर नियम पाळावे लागतील. त्याचबरोबर राजकीय आघाडी (Political Alliance) आणि जनतेचे समर्थन (Public Support) यांचीही मोठी भूमिका असेल.























