(Source: ECI/ABP News/ABP Majha)
DOLO-650 साठी कंपनीनं डॉक्टरांवर उगीच नाही कोट्यवधी उधळले, 500MG च्या पुढील डोसची किंमत ठरवण्याचा अधिकार कंपनीला
Dolo-650 : कोरोना काळात ताप आलेल्या अथवा कोरोना रुग्णांच्या प्रिस्क्रिप्शनवर प्रत्येक डॉक्टर डोलो 650 हे नाव लिहित होते.
Dolo-650 : कोरोना महामारीमध्ये (Coronavirus) 'डोलो 650' (Dolo-650) गोळी चर्चेत आली. डॉक्टर कोरोना रुग्णांना अथवा कोरोनाची लक्षणं असणाऱ्यांना प्राथमिक उपचार म्हणून 'डोलो 650' गोळी देत होते. तुम्हीही कोरोना काळात ही गोळी खाल्ली असेल. अल्पवधीतच या गोळीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली होती. कोरोना काळात ताप आलेल्या अथवा कोरोना रुग्णांच्या प्रिस्क्रिप्शनवर प्रत्येक डॉक्टर डोलो 650 हे नाव लिहित होते. पण आता यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचं समोर आलेय. गोळ्यांची विक्री वाढवण्यासाठी डोलो 650 गोळी तयार करणाऱ्या कंपनीने देशभरातील डॉक्टरांना 1000 कोटी रुपयांचे गिफ्ट दिल्याचं समोर आले आहे. याबाबत सुप्रीम कोर्टात जनहितयाचिकाही दाखल करण्यात आली आहे.
डोलो 650 गोळी तयार करणाऱ्या कंपनीचं नाव मायक्रो लॅब्स लिमिडेट (Micro Labs Ltd) आहे. आयकर विभागाने गेल्या महिन्यात 9 राज्यातील कंपनीच्या 36 ठिकाणी छापेमारी केली. गोळ्यांची विक्री वाढवण्यासाठी डॉक्टरांना 1000 कोटी रुपयांच्या भेटवस्तू दिल्याचा आरोप कंपनीवर लावण्यात आला आहे. पण प्रश्न हा आहे की डोलो 650 च का? 650 एमजीच्या टॅबलेटमध्ये असं काय आहे?
650 एमजीच्या पाठीमागील गुपीत काय?
500 मिलीग्राम पॅरासिटामॉल गोळ्यांची किंमत सरकारकडून ठरवली जाते. त्यापेक्षा जास्त मिलीग्रामच्या गोळ्यांची किंमत फार्मा कंपनी ठरवते. म्हणूनच 500 एमजीपेक्षा जास्त मिलीग्रामच्या गोळ्यांच्या किंमत जास्त असते. मायक्रो लॅब्स कंपनीही डोलो 650 चं प्रमोशन करत नफा कमवत आहे. कोरोना काळात डोलो 650 गोळ्यांची विक्री मोठ्या प्रमाणात झाली. डॉक्टरांनीही प्रिस्क्रिप्शनवर डोलो 650 या गोळीचेचं नाव लिहिलं. डॉक्टरांपासून अनेक तज्ज्ञ तापावर डोलो 650 प्रभावी असल्याचं सांगत होते. इतकेच नाही तर मेडिकलवाल्यांनीही कोरोनाकाळात तापावर डोलो 650 गोळ्या दिल्या.
सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनाही कोरोनात डोलो 650 दिली -
गुरुवारी सुप्रीम कोर्टात डोलो 650 गोळीची चर्चा झाली. सुप्रीम कोर्टात डोलो 650 कंपनीविरोधात एक जनहितयाचिका दाखल करण्यात आली होती. गोळ्यांची विक्री वाढवण्यासाठी डॉक्टरांना भेटवस्तू दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. याच्या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश चंद्रचूड यांनीही याची गंभीर दखल घेतली. त्यासोबतच यावेळी ते म्हणाले की, कोरोना काळात ही गोळी घेण्याचा सल्ला मला डॉक्टरांनी दिला होता.
DOLO 65O गोळ्यांची विक्री वाढण्यासाठी कंपनीकडून 1000 कोटींची गिफ्ट -
'डोलो 650' गोळ्यांची विक्री वाढण्यासाठी कंपनीने डॉक्टरांना 1000 कोटी रुपयांपेक्षा जास्त गिफ्ट दिल्याचा दावा याचिकाकर्त्याने सुप्रीम कोर्टात केला. कोरोना रुग्णाच्या प्रिस्क्रिप्शनवर 'डोलो 650' या गोळीच नाव लिहिण्यासाठी कंपनीने देशभरातील डॉक्टरांना 1,000 कोटी रुपयांचे गिफ्ट दिल्याचा दावा केलाय. फेडरेशन ऑफ मेडिकल अॅण्ड सेल्स रिप्रेजेंटेटिव्ह असोसिएशनकडून (FMRAI) वकील सजंय पारिख यांनी कोर्टात बाजू मांडली. संजय पारिख यांनी सुप्रीम कोर्टात सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सच्या (CBDT ) रिपोर्टचा हवाला दिला.
कोर्टानं केंद्राकडे मागितलं उत्तर -
डोलो 650 संदर्भातील याचिकेबाबत केंद्र सरकारकडून ASG चे एम नटराज यांनी बाजू मांडली. या याचिकेची गंभीर दखल घेत कोर्टानं केंद्र सरकारकडे उत्तर मागितले आहे. आठवडाभरात केंद्र सरकारला याबाबत उत्तर मागितले आहे. दहा दिवसानंतर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.