S R Parthiban : निलंबनामध्येही ड्रामेबाजी, लोकसभेत गैरहजर तरीही नजरचुकीने झाली खासदाराच्या निलंबनाची घोषणा, चूक लक्षात आल्यानंतर यादीतून नाव वगळलं
Opposition MPs Suspended: डीएमके पक्षाचे खासदार एस. आर. पार्थिबन (S. R. Parthiban) यांच्या निलंबनाची घोषणा ही नजरचुकीने झाल्याचं लक्षात येताच त्यांचे निलंबन मागे घेण्यात आलं आहे.
नवी दिल्ली: संसद सुरक्षेच्या मुद्द्यावरून सभागृहात गोंधळ (Parliament security Breach) केल्याप्रकरणी लोकसभेतील 14 खासदारांचे निलंबन केल्याची घोषणा दुपारी करण्यात आली होती. त्यापैकी एका खासदाराचे निलंबन मागे घेण्यात आले आहे. एकूण निलंबित खासदारांची संख्या आता 13 आहे. डीएमडीके (DMK) पक्षाचे खासदार एस. आर. पार्थिबन (S. R. Parthiban) यांचे निलंबन नजरचुकीने झाल्याचे लक्षात आल्याने लोकसभा सचिवालयाकडून निलंबित खासदारांच्या यादीतून त्यांचे नाव वगळण्यात आले आहे. एस. आर. पार्थिबन हे लोकसभेच्या गोंधळावेळी सदनात उपस्थित नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
द्रमुकचे खासदार एसआर पार्थिबन यांचे निलंबन मागे
संसदेच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी आज संसदेत गोंधळ घातला. त्यानंतर सुरुवातीला लोकसभेच्या 13 आणि राज्यसभेचा एक अशा 14 खासदारांचे निलंबन केल्याची घोषणा करण्यात आली. मात्र आता निलंबित खासदारांच्या यादीतून सरकारने द्रमुकचे खासदार एसआर पार्थिबन यांचे लोकसभेतील निलंबन मागे घेतले आहे. कारण त्यांचे नाव निलंबनाच्या यादीत चुकून आले होते. चूक समजल्यानंतर त्यांचे नाव तात्काळ मागे घेण्यात आले.
संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, सदस्याची ओळख पटवण्यात कर्मचार्यांकडून चूक झाल्याने पार्थिबन यांचे नाव निलंबित लोकसभा सदस्यांच्या यादीतून काढून घेण्यात आले आहे. चुकीच्या ओळखीचे प्रकरण असल्याने सदस्याचे नाव वगळण्याची विनंती मी सभापतींना केली आहे. अध्यक्षांनीही ही सूचना मान्य केली आहे.
अधिवेशनाच्या उर्वरित कामकाजातून 13 खासदार निलंबित
संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, सभागृहाचे कामकाज नवीन संसदेच्या इमारतीत हलविण्यात आले तेव्हा सभापतींनी कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत सदस्यांना फलक न लावण्याचा नवीन ठराव घेऊन काम करावे लागेल असा प्रस्ताव मांडला होता. त्यावेळी कोणीही विरोध केला नव्हता. आता 13 खासदारांनी कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाचे उल्लंघन केले आहे. त्यांनी सभागृहात फलक आणले, त्यामुळे त्यांना हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित कामकाजासाठी निलंबित करण्यात आले आहे.
या खासदारांच निलंबन -
लोकसभा खासदार -
- टीएन प्रथापन, काँग्रेस
- हीबी एडेन, काँगेस
- जोथिमनी, काँग्रेस
- राम्या हरिदास , काँग्रेस
- डीन कुरियाकोस, काँगेस
- बेनी बेहनन, काँग्रेस
- वी के श्रीकंदन, काँग्रेस
- मोहम्मद जावेद, काँग्रेस
- पीआर नटराजन, माकप
- कनिमोई करुणानिधि, द्रमुक
- के सुब्रमण्यन
- एस वेंकटेशन, माकप
- मणिकम टैगोर, काँग्रेस
राज्यसभा खासदार-
- डेरेक ओब्रायान, तृणमूल
ही बातमी वाचा: