गोव्यातील भाजप आघाडी सरकार बरखास्त करा; शिवसेनेची राज्यपालांकडे मागणी
शिवसेनेने राज्यभरातून गोळा केलेल्या 5 हजार सह्यांचे निवेदन यावेळी राज्यपालांना सादर केले. या मोहिमेअंतर्गत डिचोली बाजारपेठ, म्हापसा बाजारपेठ, साखळी बाजारपेठ, धारगळ, मडगाव, केपे आणि राज्यभरातून हजारो लोकांच्या भावना समजून घेण्यात आल्या होत्या.
पणजी : भाजप आघाडी सरकार कुचकामी ठरले असून हे सरकार त्वरित बरखास्त करून लोकांना नवीन सरकार निवडण्याची संधी द्या, अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने गोवा राज्य प्रमुख जितेश कामत यांच्या नेतृत्वाखाली राज्यपाल मृदूला सिन्हा यांची भेट घेऊन केली. शिवसेनेने राज्यभरातून गोळा केलेल्या 5 हजार सह्यांचे निवेदन यावेळी राज्यपालांना सादर केले.
शिष्टमंडळात राज्य सरचिटणीस मिलिंद गावस, उपराज्यप्रमुख मायकल लोबो, दक्षिण जिल्हा प्रमुख अॅलेक्सी फर्नांडिस आणि प्रसिद्धी माध्यम समन्वयक मनोज सावंत यांचा समावेश होता.
जितेश कामत पुढे म्हणाले, सरकारातील दोन माजी मंत्री तथा विद्यमान आमदार हॉस्पिटलमध्ये आहेत. इतर काही आमदार आणि मंत्री आजारी असल्याने प्रशासन ठप्प झाले आहे. मुख्यमंत्री आपल्या आजारपणाच्या उपचारासाठी सतत गोव्याबाहेर जात असल्याने प्रशासनाची तब्येत जास्तच गंभीर झाली आहे. त्यामुळे सरकार बरखास्त करून लोकांना स्वतःच्या मतांचा अधिकार वापरून तंदुरुस्त सरकार स्थापन करण्यास देणे अशी मागणी करत गोवा राज्य शिवसेनेतर्फे राज्यभरात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली होती.
या मोहिमेअंतर्गत डिचोली बाजारपेठ, म्हापसा बाजारपेठ, साखळी बाजारपेठ, धारगळ, मडगाव, केपे आणि राज्यभरातून हजारो लोकांच्या भावना समजून घेण्यात आल्या होत्या. सरकाराच्या बेभरवशी कारभारावर जनता त्रस्त असून सर्वत्र असंतोष व्यक्त करण्यात येत असल्याचे स्पष्टपणे आढळून आले असल्याचे मत कामत यांनी व्यक्त केले.
मुख्यमंत्र्यांना पदमुक्त करून आराम देण्याचे सोडून पूर्ण मंत्रिमंडळ दिल्लीत जाऊन बैठक घेणे दुर्दैवी आहे. शिवसेना त्याचा निषेध करत असल्याचे कामत यांनी यावेळी सांगितले. विधानसभाही उचलून दिल्लीत नेण्याचा उपरोधात्मक सल्ला कामत यांनी दिला आहे. चर्चेदरम्यान खराब रस्ते, पाण्याच्या समस्येविषयी लोकांच्या तक्रारी असल्याचे राज्यपालांच्या निदर्शनास आणल्यानंतर मंत्री ढवळीकर यांना बोलवून घेऊन आढावा घेतला जाणार असल्याचे आश्वासन राज्यपालांनी दिल्याचे कामत म्हणाले.