दिल्ली बनतेय कोरोनाची राजधानी, मुंबईतला वेग मंदावला तर दिल्लीत थैमान सुरु!
राजधानी दिल्ली आता कोरानाची राजधानी बनतेय. ज्या मुंबईत आजवर सर्वाधिक थैमान होतं, तिथे मात्र कोरोना आता मंदावतोय. त्यामुळेच कोरोनानं आपला मोर्चा मुंबईकडून दिल्लीकडे वळवला आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय.
नवी दिल्ली : एकीकडे दिल्लीत दिवसाला 7 हजार पेक्षा जास्त केसेस...तर दुसरीकडे मुंबईत मात्र कोरोना हीच संख्या एक हजारपेक्षा कमी. ज्या मुंबईत कोरोनाचा सर्वाधिक उद्रेक होता तिथे आता परिस्थिती सुधारतेय, तर दुसरीकडे दिल्लीत मात्र कोरोनाचा विळखा वाढतोय. दिल्लीत काल या वाढीने नवा विक्रमच नोंदवला आहे. गेल्या 24 तासात दिल्लीत तब्बल 7174 नवे कोरोनाबाधित नोंदवण्या आले आहेत. आजवर संपूर्ण देशात 24 तासात वाढलेली हा सर्वात मोठा आकडा आहे. दोन दिवसांपूर्वीच केरळमध्ये 7002 रुग्णांची नोंद झाली होती. दिल्लीने त्याच्या पुढेही मजल मारली आहे.
जुलै महिन्यात कोरोनावर प्रभावी नियंत्रण केलं म्हणून दिल्ली मॉडेलची चर्चा सुरु होती. पण आता परिस्थिती पूर्ण बदलली आहे. ज्या दिल्लीत अगदी मागच्या दहा दिवसांपर्यंत दिवसाला दोन-अडीच हजार पेशंट सापडत होते, तो आकडा वेगाने दुप्पट तिप्पट होऊ लागला आहे
वाढती थंडी, प्रूदषण आणि सणासुदीच्या तोंडावर लोकांचा निष्काळजीपणा अशी तीन कारणं दिल्लीतल्या वाढीमागे सांगितली जात आहेत. पुढचे तीन महिने दिल्ली, उत्तर भारतासाठी धोक्याचे आहेत असंही तज्ज्ञ म्हणत आहेत. त्यात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सर्व बंधनं तातडीने शिथील केली होती. मुंबईत आता कुठे हॉटेल, रेस्टाँरंट सुरु आहेत. दिल्लीत ती सप्टेंबरपासूनच सुरु झाली होती. दिल्लीतली मेट्रोही 7 सप्टेंबरपासूनच सुरु झाली होती.
गेल्या पाच दिवसांत कोरोनाच्या रुग्णांची आकडेवारी 2 नोव्हेंबर- 4001 3 नोव्हेंबर- 6725 4 नोव्हेंबर- 6842 5 नोव्हेंबर- 6715 6 नोव्हेंबर- 7174
दिल्लीत कोरोना बाधितांचा एकूण आकडा 4 लाख 23 हजार इतका तर आहे. तर आजवर 6, 833 कोरोना बळी ठरले आहेत.
गेल्या चोवीस तासात दिल्लीत 64 जणांचा कोरोनामुळे मृत्य झाला. आजवर देशात 24 तासात झालेल्या कोरोना बळींच्या क्रमवारीत हा आकडा दुसऱ्या क्रमांकावर आहे. दिल्लीतून देशाची सत्ता चालते. त्यामुळे दिल्लीतल्या कोरोनाची स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अमित शाहांनी पुढाकार घेतला होता. संयुक्त बैठकाही घेतल्या होत्या. आता जेव्हा कोरोनाचा विळखा वाढत चाललाय, त्याहीवेळी तातडीने पावलं उचलली जातील अशी अपेक्षा करुया.
एकीकडे दिल्लीतला आकडा भयानक वेगाने वाढतोय, तर दुसरीकडे ज्या मुंबईत सर्वाधिक उद्रेक मानला जात होता, तिथे मात्र कोरोना आता मंदावतोय. दिल्ली हे काही मुंबईसारखं खचाखच गर्दीचं शहर नाही. इथे धारावीसारख्या झोपडपट्यांची चिंता नाही. मुंबईच्या तुलनेत दिल्लीतलं सरकार लॉकडाऊन सैल करण्याबाबत खूप बिनधास्तही होतं. त्यामुळे आता कोरोनाच्या या थैमानाला अटकाव करण्यासाठी दिल्ली मुंबईकडून काही शिकणार का असंच म्हणायची वेळ आली आहे.