नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी मतमोजणी सुरू झाली आहे. सुरुवातीच्याच कलांमध्ये आम आदमी पार्टिने मुसंडी मारली असून भाजप पिछाडीवर आहे. त्यामुळे यंदा अरविंद केजरीवाल हॅट्रीक मारणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. अशातच भारतीय जनता पार्टि (भाजप) च्या दिल्ली प्रदेश कार्यालयाबाहेरील पोस्टर चर्चेत आलं आहे. हे पोस्टर समोर आल्यानंतर निकाला आधीच भाजपने पराभव स्विकारला होता? अशा चर्चा होताना दिसत आहेत.


भाजपच्या दिल्ली कार्यालयामध्ये पोस्टर लावण्यात आलं आहे. या पोस्टरवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यंचा फोटो असून त्यावर लिहिण्यात आलं आहे की, 'विजय से हम अहंकारी नहीं होते और पराजय से हम निराश नहीं होते.' म्हणजेच, विजयामुळे आमच्यात अहंकार येत नाही आणि पराभवामुळे आम्ही निराश होत नाही. असा आशय लिहिण्यात आला आहे. हे पोस्टर भाजपच्या दिल्ली युनिटनेच लावलं आहे. दरम्यान, अद्याप मतमोजणी सुरू असून भाजप नेत्यांनी आम्हीच जिंकणार असा दावाही केला आहे.


दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आज (11 फेब्रुवारी) जाहीर होणार आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीच्या कलांनुसार आपने बहुमताचा आकडा पार केला आहे. तर काँग्रेसला अद्याप एकाही जागेवर खातं उघडता आलं नाही. त्यामुळे आता अरविंद केजरीवाल पुन्हा दिल्लीचे मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.


दिल्ली विधानसभेसाठी यंदा एकूण 672 उमेदवार मैदानात आहे, ज्यात 593 पुरुष आणि 79 महिला उमेदवार आहेत. या निवडणुकीत एकूण 62.59 टक्के मतदान झालं आहे. 2015 च्या विधानसभा निवडणुकीच्या ही टक्केवारी पाच टक्क्यांनी कमी आहे. 2015 मध्ये दिल्लीत 67.49 टक्के मतदान झालं होतं. प्रमुख लढत सत्ताधारी आम आदमी पक्ष, भाजप आणि काँग्रेसमध्ये आहे.अरविंज केजरीवाल हॅटट्रिक साधून दिल्लीचं तख्त राखणार की भाजप किंवा काँग्रेस सत्ताबदल करणार हे आज स्पष्ट होईल.


एक्झिट पोलमध्ये 'आप'चा विजय


मतदानानंतर झालेल्या बहुतांश एक्झिट पोलमध्ये अंदाज वर्तवला होता की, अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष हॅटट्रिक साधून सत्ता स्थापन करेल. तर दुसरीकडे स्वबळावर सत्ता स्थापन करुन असा दावा भाजप करत आहे.


मागील निवडणुकीत 'आप'ला 67 जागांवर यश


दिल्लीमध्ये विधानसभेच्या 70 जागा आहेत. सरकार स्थापन करण्यासाठी बहुमताचा आकडा 36 आहे. मागील विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने 67 जागांवर विजय मिळवला होता.


संबंधित बातम्या : 


Delhi Election Results LIVE UPDATES | सुरुवातीच्या कलांनुसार दिल्लीत 'आप'चं सरकार


अखेर दिल्ली विधानसभा मतदानाची टक्केवारी जाहीर, विलंब झाल्याने 'आप'कडून आक्षेप 


Poll of Exit Polls | दिल्लीत 'आप'चा बोलबाला, केजरीवालच पुन्हा सत्तेत, सर्व पोल्सचा अंदाज


Delhi Exit Poll | दिल्लीत 'फिर एक बार, केजरीवाल सरकार', आप हॅटट्रिक साधणार, एक्झिट पोलचा अंदाज