नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर जवळपास २० तासाच्या नंतर अखेर मतदानाची अंतिम टक्केवारी दिल्ली निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर न केल्यामुळे आपकडून आक्षेप घेतले होते. मतदान झाल्यानंतरही मतदानाची निश्चित टक्केवारी घोषित करण्यात आली नव्हती. त्यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती.


अखेर दिल्ली आयोगाने पत्रकार परिषद घेत दिल्ली विधानसभेसाठी 62.59टक्के मतदान झाल्याची घोषणा केली. आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, काल उशिरापर्यंत मतदान सुरु होते. रात्री उशिरापर्यंत ईव्हीएम मशीन येत होत्या. पोलिंग स्टेशनवरून आलेला डेटा सिस्टममध्ये टाकला जात होता. त्यामुळे विलंब झाला. या निवडणुकीत 62.59 टक्के मतदान झाले आहे. 2015 च्या विधानसभा निवडणुकीत 67.47 टक्के मतदान झाले होते. म्हणजे यावेळी गेल्यावेळच्या तुलनेत पाच टक्के मतदान कमी झाले आहे.

 केजरीवालांनी घेतला आक्षेप  

आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी इतका वेळ होऊन देखील मतदानाची टक्केवारी जाहीर न केल्यामुळे आश्चर्य व्यक्त करत काही प्रश्न उपस्थित केले होते.  हे शॉकिंग आहे, निवडणूक आयोग काय करत आहे? मतदान होऊन इतका वेळ झाला तरी टक्केवारी का सांगितली जात नाही? असे प्रश्न त्यांनी ट्विट करत उपस्थित केले.  तर आपचे संजय सिंह यांनी म्हटलं आहे की,  दिल्ली निवडणुकीत किती टक्के मतदान झालंय, याबाबत देशातील लोकांना माहिती हवीय.  निवडणूक आयोग वोटिंगची टक्केवारी सांगायला एवढा वेळ का घेत आहे? लोकसभा निवडणुकीच्या वेळी तर एका तासाच्या आत मतदानाची टक्केवारी सांगितली जाते, मग दिल्ली सारख्या छोट्या राज्यात एवढा विलंब का? , असं संजय सिंग यांनी म्हटलं आहे.

भाजपची आपवर टीका 

आपकडून आक्षेप घेतल्यानंतर भाजपकडून मात्र आपवर टीका केली आहे. दिल्ली भाजपचे अध्यक्ष मनोज तिवारी यांनी आपवाले उगाच परेशान होत असल्याचे म्हटलं आहे. एक्झिट पोलमध्ये आपला ४४ जागा मिळत असल्याचे सांगितलं जात आहे मात्र तरीही त्यांची धाकधूक होत आहे. आतापासूनच हे लोक एव्हीएमला दोष देण्याची योजना बनवता आहेत, आप हताश झाली आहे, असे तिवारी यांनी म्हटलं आहे.

पुन्हा केजरीवालच सत्तेत, एक्झिट पोलचा अंदाज

एबीपीन्यूज आणि सी व्होटरच्या सर्व्हेनुसार दिल्लीतील एकूण  70 विधानसभा जागांपैकी आम आदमी पार्टी (AAP) ला  51 ते 65 जागा मिळू शकतात असा अंदाज आहे. भाजपच्या खात्यात  3 ते 17 जागा तर काँग्रेसला 0 ते 3 जागा मिळू शकतात असा अंदाज आहे. सर्व्हेनुसार सरासरी आपला  58, भाजपला  10 आणि काँग्रेसला दोन जागा मिळू शकतात असा अंदाज आहे.

काय आहे पोल ऑफ पोलचा अंदाज 

सर्व्हे एजन्सी / वाहिनी                    AAP            BJP        Congress
एबीपी-सी व्होटर                           51-65          3-17       0-3
आज तक- एक्सिस माय इंडिया     59-68          2-11      0
रिपब्लिक- जन की बात                 48-61          9-21    0-1
टाइम्स नाऊ-आयपीएसओएस         47              23          0
टीव्ही -9 आणि सिसरो                     54            15            1
इंडिया न्यूज-नेता                         53-57         11-17           0-2

पोल ऑफ एग्जिट पोल्स सरासरी    56               13              1


काय आहे एबीपी न्यूज सी व्होटरचा सर्व्हे

एबीपी न्यूज सी व्होटरच्या अंदाजानुसार दिल्लीमध्ये 2020 च्या विधानसभा निवडणुकीत एकूण 70 जागांपैकी आम आदमी पक्षाला 51 ते 65 जागा मिळण्याचा अंदाज आहे. या आकड्यानुसार पुन्हा एकदा केजरीवाल यांची एकहाती सत्ता दिल्लीत येण्याची चिन्हे आहेत. भाजपला यावेळी 5 ते 19 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर काँग्रेसला 0 ते चार जागा मिळण्याचा अंदाज आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे अरविंद केजरीवाल यांना शह देण्यासाठी भाजपने उभे केलेल्या मनोज तिवारी यांची जागा देखील धोक्यात असल्याचे या सर्व्हेत सांगण्यात आले आहे.


Delhi Opinion Poll | दिल्लीकरांचा विश्वास केजरीवालांवरच, पुन्हा सत्ता 'आप'च्या हाती, सर्वेचा अंदाज

कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार 

आम आदमी पक्ष -  51 ते 65 जागा

भाजप - 3 ते 17 जागा

काँग्रेस -0 ते 3 जागा

कोणत्या पक्षाला किती टक्के मतदान 

आप - 50.4

भाजप - 36

काँग्रेस - 9

इतर - 2.6

Delhi Election 2020 Opinion Poll : मुख्यमंत्रीपदी पुन्हा केजरीवाल यांनाच पसंती

2015 च्या निवडणुकीत काय होती स्थिती 
2015 च्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने 70 जागांपैकी 67 जागांवर दणदणीत विजय मिळवत एकहाती सत्ता स्थापन केली होती. त्यावेळी भाजपला केवळ तीन जागा मिळाल्या होत्या तर काँग्रेसला खातं देखील उघडता आलेलं नव्हतं.