जातीनिहाय जनगणनेबाबत योग्य तो निर्णय घेऊ; पंतप्रधान मोदींचं आश्वासन
केवळ बिहारच नाही तर संपूर्ण देशभरात जातिनिहाय जनगणनेचा मुद्दा गाजतोय. विशेषतः ओबीसी आरक्षणाचा निर्णय झाल्यानंतर जातिनिहाय जनगणनेचं काय होणार? अशी विचारणा विविध राजकीय पक्षांकडून, राज्यांकडून होत आहे.
नवी दिल्ली : जातिनिहाय जनगणनेबाबत योग्य तो निर्णय घेऊ, असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील सर्वपक्षीय शिष्टमंडळाला आज दिलं. जातिनिहाय जनगणना करण्याच्या मागणीसाठी बिहारमधील दहा पक्षांच्या नेत्यांचं शिष्टमंडळ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटलं. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्त्वाखाली पंतप्रधानांच्या भेटीसाठी गेलेल्या या शिष्टमंडळात विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांच्यासह वेगवेगळ्या पक्षांचे नेते सहभागी झाले होते. या शिष्टमंडळाशी चर्चा केल्यानंतर जातिनिहाय जनगणनेबाबत योग्य तो निर्णय घेऊ, असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं आहे.
केवळ बिहारच नाही तर संपूर्ण देशभरात जातिनिहाय जनगणनेचा मुद्दा गाजतोय. विशेषतः ओबीसी आरक्षणाचा निर्णय झाल्यानंतर जातिनिहाय जनगणनेचं काय होणार? आणि केंद्रानं ती लवकर करावी, अशी मागणी विविध राजकीय पक्षांकडून, विविध राज्यांकडून होत आहे. याच पार्श्वभूमीवर बिहारचं एक शिष्टमंडळानं आज पंतप्रधानांची भेट घेतली.
मोदींसोबत भेट झाल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलताना म्हणाले की, "सर्वांनीच एकत्र जातिनिहाय जनगणनेची मागणी केली आहे. पंतप्रधान मोदींनी आम्हा सर्वांचं म्हणणं व्यवस्थित ऐकून घेतलं. आम्ही पंतप्रधानांना याविषयी लक्ष घालून योग्य तो निर्णय घेण्याचं आवाहन केलं. त्यावेळी राज्य विधानसभेत दोनदा जातीच्या जनगणनेचे ठराव कसे पारित झाले, हे आम्ही त्यांना सांगितले. त्यांनी आमचं म्हणणं ऐकून घेतंल. त्यामुळे पंतप्रधान या साऱ्या गोष्टींचा नक्कीच विचार करतील."
आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी म्हटलं की, "जातिनिहाय जनगणनेमुळं देशाला फायदा होईल. मंडल आयोगापूर्वी, देशात किती जाती आहेत हे माहित नव्हते. मंडल आयोगानंतर समजलं की, देशात हजारो जाती आहे. जर जनावरांची मोजणी होते, झाडांची मोजणी होते, तर मग माणसांचीही होणं आवश्यक आहे. कल्याणकारी योजानांसाठी जातिनिहाय जनगणना होणं आवश्यक आहे. हे शिष्टमंडळ जे प्राप्त झाले आहे, ते केवळ बिहारसाठी नाही, ते संपूर्ण देशासाठी आहे. आम्ही विरोधी पक्ष म्हणून नेहमीच राष्ट्रीय हिताच्या मुद्द्यांवर सरकारला पाठिंबा दिला आहे. "
दरम्यान, बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी म्हटलं की, "आम्ही पंतप्रधानांना कोणत्याही परिस्थितीत जातिनिहाय जनगणने करण्यास सांगितलं आहे. असं करणं हा ऐतिहासिक निर्णय असेल. त्यांनी आमचं म्हणणं खूप गांभीर्याने ऐकलं आहे. त्यामुळे आम्हाला वाटते की, लवकरच योग्य तो निर्णय घेतला जाईल. जातीय जनगणना मुद्द्यावर आम्ही सर्वजण एकत्र आहोत."