NEET परीक्षेत अपयश आल्याने मुलाचं टोकाचं पाऊल, दुसऱ्या दिवशी वडिलांनीही संपवलं जीवन; नीटमधून बाहेर पडण्याची तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची घोषणा
Tamil Nadu News : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी दावा केला की, काही महिन्यांत तामिळनाडू राज्य NEET परीक्षेतून बाहेर पडेल.
Chennai : मेडिकलच्या नीट परीक्षेत (NEET Exam) अपयश आल्याने एका मुलाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे मुलाच्या आत्महत्येनंतर दुसऱ्याच दिवशी राहत्या घरात वडिलांचा मृतहेद आढळून आला, अशी माहिती चेन्नई पोलिसांनी दिली आहे. आपल्या मुलाच्या मृत्यूचे दुःख सहन न झाल्याने सेल्वसेकर यांनी राहत्या घरी गळफास लावून आयुष्य संपवलं, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेवर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मुलाची आत्महत्या, मग वडीलांनीही संपवलं जीवन
चेन्नईमधील जगदिश्वरन (Jagadeeswaran) हा विद्यार्थी मेडिकल अभ्यासक्रमात प्रवेशासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून घेण्यात येणाऱ्या नीट (NEET) परीक्षेत नापास झाला. जगदिश्वरन 2022 मध्ये 427 गुणांसह बारावी पास झाला. मात्र, जगदीश्वरनला दोन प्रयत्नांत नीट परीक्षा उत्तीर्ण होता आलं नाही. शनिवारी त्याने वडिलांच्या फोनला प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर घरात त्याचा मृतदेह आढळला. मुलाच्या आत्महत्येमुळे वडील सेल्वसेकर यांच्या मनावर मोठा आघात झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जगदिश्वरनचे वडील सेल्वसेकर मृतावस्थेत आढळल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
'तामिळनाडूतून नीट परीक्षा रद्द करण्यात येईल'
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी या दुर्घटनेवर हळहळ व्यक्त करत मृतांच्या कुटुंबियांचे सांत्वन केलं आहे. त्यांनी आवाहन केलं आहे की, विद्यार्थ्यांनी आत्महत्येचा विचार मनात आणू नका, स्वत:वर विश्वास ठेवा आणि आयुष्य जगा. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी दावा केला की, काही महिन्यांत NEET परीक्षा रद्द करण्यात येईल.
विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचं वाढतं प्रमाण पाहता सरकारचं पाऊल
मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी सांगितलं आहे की, 'विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचं वाढतं प्रमाण पाहता, सरकार राज्य NEET परीक्षेतून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात आहे. स्वत:वर विश्वास ठेवा. अशा परिस्थितीत आत्महत्येचा विचार मनात आणू नका. विद्यार्थ्याच्या मार्गातील अडथळा ठरणारी तामिळनाडू परीक्षेतून बाहेर पडेल. तामिळनाडू सरकार यासाठी प्रयत्नशील आहे.'
नीट परीक्षा वगळण्यासाठी विधेयक मंजूर
तामिळनाडू विधानसभेने 2021 मध्ये, NEET मधून बाहेर पडण्यासाठी विधेयक मंजूर केलं. नीट परीक्षा खाजगी प्रशिक्षण घेऊ शकणार्या श्रीमंत विद्यार्थ्यांसाठी असून आणि गरीब कुटुंबातील आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या बारावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवूनही त्यांना मेडिकल अभ्यासक्रमात प्रवेश मिळत नाही, असं सरकारनं म्हटलं होतं.
मुख्यमंत्र्यांचा राज्यपालांवर आरोप
तामिळनाडू सरकारने राष्ट्रीय वैद्यकीय प्रवेश परीक्षेतून बाहेर पडण्यासाठी विधेयक पारीत केलं होतं. विद्यार्थ्यांना बारावीच्या गुणांवर वैद्यकीय प्रवेश मिळावा, यासाठी हे विधेयक मंजूर करण्यात आलं. हे विधेयक स्वाक्षरीसाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे पाठवलं आहे. दरम्यान, हे विधेयक राज्यपाल आर एन रवी यांच्याकडून राष्ट्रपतींकडे पाठवण्यात उशीर झाला आणि त्यामुळे हे प्रकरण अद्याप प्रलंबित असल्याचा आरोप मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी केला आहे.