Cyrus Mistry : कसा होतो पारशी समुदायाचा अंत्यविधी? दखमा पद्धत किंवा टॅावर ॲाफ सायलेन्स काय आहे?
Parsi : पारशी समुदायामध्ये पारंपरिक अंत्यविधी पद्धतीनुसार मृतदेह हा टॉवर ऑफ सायलेन्समध्ये (Tower of Silence) मध्ये ठेऊन मांसाहारी पक्षांना खायला दिला जातो.
मुंबई: टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे रविवारी अपघाती निधन झालं. अहमदाबादवरुन मुंबईला येताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला आणि त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. सायरस मिस्त्री यांच्या निधनामुळे उद्योग जगतातील एक उमदं व्यक्तीमत्व हरवलं. सायरस मिस्त्री हे पारशी समाजाचे होते. पण त्यांच्या अंत्यविधीचा कार्यक्रम हा परंपरागत पारशी पद्धतीने म्हणजे 'दखमा' किंवा 'टॉवर ऑफ सायलेन्स'मध्ये गिधाडांसाठी न टाकता स्मशानभूमीत दहन पद्धतीने पार पाडण्यात आलं.
जगातील सर्वात लहान समूह असलेला पारसी समाज हा व्यवसायाच्या बाबतीत सर्वात यशस्वी आहे. पारसी हा जगातील सर्वात जुन्या धर्मांपैकी एक धर्म आहे. पारशी मूळचे ईराणी आहेत. जगभराचा विचार करता पारशी समाजातील लोकांची संख्या ही एक लाखाच्या आसपास आहे. यातील सर्वाधिक म्हणजे 60 हजारांच्या जवळपास लोकसंख्या ही भारतात आहे. पारशी समाज बहुतांशी मुंबईमध्ये राहत असून गुजरातमध्येही काही संख्येने ते राहतात.
प्रेत आकाशाला सोपवलं जातं
हिंदू धर्मामध्ये प्रेताच दहन केलं जातं, मुस्लिमांमध्ये त्याचे दफन केलं जातं. पारशी धर्मामध्ये जल, अग्नी आणि जमीन या तिन्ही गोष्टींना पवित्र मानलं जातं. त्यामुळे प्रेताचं दहन केलं जात नाही, तसेच दफनही केलं जात नाही किंवा प्रेत पाण्यात सोडलं जात नाही. या व्यतिरिक्त प्रेत हे आकाशाला (Sky Burials) सोपवलं जातं.
दखमा किंवा टॉवर ऑफ सायलेन्स काय आहे?
पारशी समुदायामध्ये प्रेताला दखमा (Dakhma) किंवा टॉवर ऑफ सायलेन्समध्ये (Tower of Silence) ठेवलं जातं. दखमा ही पारशी समाजाची वास्तू शक्यतो शहरापासून दूर, निर्जन ठिकाणी असते. दखमा ही वास्तू उंच आणि गोलाकार असते. या वास्तूच्या वरच्या भागात गोलाकार असा खोलगट भाग असतो. सूर्योदय झाल्यानंतर प्रेताचं शुद्धीकरण करुन या ठिकाणी ठेवलं जातं. हे प्रेत गिधाडं किंवा इतर मांसाहारी पक्षांना सोपवलं जातं. पारशी समुदायामध्ये ही सर्वात पवित्र पद्धत मानली जाते.
अंतिम संस्काराची पद्धत बदलली
गेल्या काही वर्षांमध्ये गिधाडांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. जगभरातील 99 टक्के गिधाडं ही नष्ट झाल्याचं एक आकडेवारी सांगतेय. त्यामुळे प्रेतांच्या अंतिम संस्काराचं काय याची चिंता पारशी समुदायाला सतावत आहे. त्यामुळे पारंपरिक दखमा पद्धतीमध्ये आता हळूहळू बदल करण्यात येत असून अंतिम संस्काराची पद्धतही बदलली आहे.
वरळीमध्ये पारशी समाजासाठी स्मशानभूमी
दिवंगत उद्योगपती जेआरडी टाटा यांनी सर्वप्रथम पारशी समुदायाला स्वतंत्र अशी स्मशानभूमी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केल्याचं सांगितलं जातं. नंतरच्या काळात पारशी समुदायाला वरळीमध्ये स्वतंत्र्य अशी स्मशानभूमी मिळाली. पारशी समुदाय हा दक्षिण मुंबईमध्ये एकवटला असून वरळीची स्मशानभूमी त्यांच्यासाठी सोईस्कर आहे. पण पारंपरिक पद्धत सोडून स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्याच्या पद्धतीला सुरुवातीला समाजातील काही लोकांनी विरोध केला. पण नंतरच्या काळात हा विरोध मावळत गेला. 2015 साली मुंबई महापालिका आणि पारशी समुदायाच्या वतीनं वरळीतील स्मशानभूमीला अत्याधुनिक रुप देण्यात आलं.
पारशी समुदायाकडे अंत्यविधीसाठी सध्या तीन पर्याय उपलब्ध आहेत,
1. प्रेतावर पारंपरिक पद्धतीने दखमामध्ये अंत्यसंस्कार.
2. प्रेताचं स्मशानभूमीत दफन.
3. प्रेताचं स्मशानभूमीत दहन.