(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Cyclone Biparjoy Update : बिपरजॉय वादळाचे रौद्ररुप, मुसळधार पाऊस, कच्छमध्ये भूकंपाचे धक्के, गुजरातमध्ये 50 हजार जणांचं स्थलांतर
Cyclone Biparjoy : गुजरातमधील कच्छ आणि सौराष्ट्राला चक्रीवादळाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Cyclone Biparjoy Latest Update : अरबी समुद्रात निर्माण झालेलं बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातच्या दिशेनं उत्तर-पश्चिम मार्गानं पुढे सरकत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळं गुजरातमधील कच्छ आणि सौराष्ट्राला चक्रीवादळाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. चक्रीवादळामुळं येणाऱ्या मुसळधार पावसानं सखल भागात पाणी साचण्याची, पूर येण्याची आणि किनाऱ्यालगत भरतीमुळं उंच लाटा निर्माण होण्याची शक्यता आहे. बिपरजॉय चक्रीवादळ गुरुवारी संध्याकाळी गुजरातच्या किनाऱ्यावर धडकणार आहे. सुरक्षेच्या कारणामुळे आतापर्यंत 50 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे. भुज आणि कच्छमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. भूकंपाची तिव्रता 3.3 रिश्टर स्केल इतकी होती. भूकंपाच्या सौम्य धक्क्यानंतर स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले होते. सौराष्ट्र-कच्छ भागात सोसाट्याच्या वारा सुटलाय, त्यामध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण झाले होते. आतापर्यंत 50 हजार जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेय.
बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातमधील जखाऊ पोर्टजवळून जाण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास ताशी 125 ते 135 किलोमीटर वाऱ्याच्या वेगासह जमिनीवर धडकणार असल्याची माहिती आहे. त्यामुळं कच्ची घरं आणि बांधकामं कोसळू शकतात, झाडं पडू शकतात आणि वीजपुरवठ्यावरही परिणाम होण्याची चिन्हं आहेत. मुसळधार पावसाचा रस्ते, दळणवळण आणि कनेक्टिव्हिटीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफ आणि लष्कराच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत. गुजरातमधील कच्छ आणि सौराष्ट्र या भागांवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे.
WATCH | बिपरजॉय की 'आहट'... ऑल इंडिया फुल 'अलर्ट' !
— ABP News (@ABPNews) June 14, 2023
देखिए, 'जनता ज़िंदाबाद' @gyanendrat1 के साथ @ReporterAnkitG | @MrityunjayNews |@manishs76884024 | @jitendradixit | https://t.co/smwhXURgtc #Gujarat #DwarkadhishTemple #Kacchh #CycloneBiparjoyUpdate #JantaZindabadOnABP pic.twitter.com/rhGD4W13Df
बिपरजॉय चक्रीवादळ गुरुवारी संध्याकाळपर्यंत गुजरातमधील सौराष्ट्र आणि कच्छमध्ये धडकणार आहे. अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिलीय. तर गेल्या सहा तासांपासून चक्रीवादळाचा वेग मंदावला आहे. आज आणि उद्या सौराष्ट्र, कच्छमध्ये मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आलाय. बिपरजॉय चक्रीवादळाचा लँडफॉल जरी गुजरातमध्ये होणार असला, तरी त्याचे परिणाम मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातही जाणवतायेत. पुढील दोन दिवस मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक आणि नंदुरबारमध्ये तुफान वेगानं वारे वाहणार आहेत, तसंच पावसाची देखील शक्यता आहे. दरम्यान, महाराष्ट्रात मान्सून दाखल झाल्यानंतर अजूनही तो सिंधुदुर्ग जिल्ह्यातच आहे. हवामानात अनुकूल बदल होत असला तरीदेखील मान्सून पुढे सरकलेला नाही. पुढील दोन दिवसांत मान्सून पुढे सरकण्याची शक्यता असून, तो 18 जूनच्या आसपास मुंबईत दाखल होईल.