Cyclone Biparjoy: बिपरजॉय गुजरातला धडकलं... लँडफॉलनंतर द्वारका आणि कच्छमध्ये विध्वंस सुरू, 240 गावांतील वीज पुरवठा खंडीत
Cyclone Biparjoy Update: बिपरजॉय चक्रीवादळचं लँडफॉल सुरु झालं असून गुजरातच्या किनारपट्टी भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत आहे. तर मुंबईतील किनारपट्टीवर वादळाचा परिणाम झाल्याचं दिसत आहे.
Cyclone Biparjoy Latest News : महाभयंकर बिपरजॉय (Cyclone Biparjoy) चक्रीवादळाने गुजरातमधील नागरिकांच्या हृदयाची धडधड वाढवलीय. कारण ताशी तब्बल 145 किलोमीटर वेगाने धडकलेल्या चक्रीवादळानंतर गुजरातमध्ये लँडफॉल सुरु झालंय. लँडफॉलनंतर गुजरातमधील द्वारका, कच्छ (Saurashtra Kutch region) आदी किनारपट्टीवर विध्वंस सुरू झाला आहे. रात्री उशिरापर्यंत लँडफॉल सुरू राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवल्यामुळे एकून किती विध्वंस होईल, हे स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे सुरक्षित स्थळी हलवलेल्या 74 हजार नागरिकांच्या मालमत्तेचं काय झालेलं असेल, हे सकाळीच स्पष्ट होईल. दरम्यान पुण्यातील NDRF चं पथक द्वारकेमध्ये मदतकार्य करत आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून आठ किनारी जिल्ह्यांमधून यापूर्वीच 74 हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलंय. चक्रीवादळाचा मोठा तडाखा कच्छच्या किनाऱ्याला तसेच देवभूमी द्वारकेला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे कच्छ किनारपट्टीतील 240 गावांतील वीजपुरवठा खंडीत करण्यात आलाय. शिवाय दुर्घटना टाळण्यासाठी सार्वजनिक वाहतूकदेखील बंद करण्य़ात आली आहे दरम्यान, गुजरातमध्ये NDRFच्या 18 तुकड्या तैनात असून लष्कर, नौदल आणि वायुदलाचीही मदत घेण्यात आली आहे.
गुजरात आणि पाकिस्तानच्या किनारपट्टीवर गुरुवारी संध्याकाळी धडकलं. त्यानंतर गुजरातमध्ये मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा (heavy rainfall and strong winds) सुरू झाला. त्यामुळे किनारपट्टीवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. वाऱ्याचा वेगही 125 ते 145 किमी इतका आहे. त्यामुळे अनेक झाडे कोसळली आहेत.
दरम्यान, राज्य सरकार आणि केंद्र सरकार सतत या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. खबरदारी म्हणून किनारी भागातील नागरिकांचे स्थलांतर करण्यात आलं आहे.
Cyclone Biparjoy Effect On Mumbai : मुंबईत समुद्र खवळला
बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम मुंबईतही जाणवतोय. मुंबईचा समुद्र खवळला आहे. मरीन ड्राईव, जुहू चौपाटी, वसई-विरारतील समुद्रकिनारी या वादळाचा परिणाम जाणवतोय. समुद्रात उंचच उंच लाटा उसळत आहेत. खबरदारी म्हणून मुंबईच्या सर्व चौपाट्या आणि सी फेस बंद करण्यात आलेत. चौपाटींवर येणाऱ्या लोकांना पोलिसांकडून बाहेर जाण्याचा आवाहन केलं जातय. शिवाय खबरदारीचा उपाय म्हणून चौपाट्यांवर जीवरक्षकही तैनात आहेत.
मुंबईच्या किनारी भागांमध्ये बिपरजॉय चक्रीवादळाचा थेट तडाखा बसला नसला तरी, समुद्र मात्र खवळलेला आहे. मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया मरीन ड्राईव्ह आणि इतर किनारी भागात काही दिवसापासून मोठ्या लाटा आपल्याला पाहायला मिळत आहेत.
ही बातमी वाचा: