(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Cyclone Biparjoy: बिपरजॉयचा धोका वाढला... गुजरात किनारपट्टीवरील 21,000 लोकांचे मदत शिबिरात स्थलांतर
Cyclone Biparjoy Latest News: बिपरजॉय चक्रीवादळामुळे गुजरातच्या किनारपट्टीवरील भागात वीज पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
Cyclone Biparjoy: बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये तब्बल 21,000 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याची माहिती आहे. येत्या दोन दिवसात बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकणार असून त्याला तोंड देण्यासाठी गुजरात सरकार आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाने सर्व तयारी केली आहे.
गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील जाखाऊ बंदराजवळ शक्तिशाली चक्रीवादळ बिपरजॉय धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागातील 21 हजार लोकांना मदत शिबिरात हलवण्यात आलं आहे. दरम्यान, गीर सोमनाथमधील सुत्रापाडा येथे समुद्राच्या लाटांचे पाणी लोकांच्या घरात शिरल्याची माहिती आहे. या भागात जोरदार वाऱ्यासह पाऊस पडत आहे.
बिपरजॉय चक्रीवादळामुळे ईशान्य अरबी समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान 31 अंश सेल्सिअसवरुन 29 अंशांपर्यंत खाली आलं आहे. समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानात संभाव्य घट होत असल्याने चक्रीवादळाचा जोर कमी होण्याचा अंदाज स्कायमेटने व्यक्त केला आहे. मात्र ताशी 120 किमीपेक्षा अधिक वेगाने वारे आणि सोबतच अतिमुसळधार पाऊस यामुळे किनारपट्टी परिसरात मोठ्या नुकसानीची शक्यता आहे.
या भागातील कच्ची घरं, बांधकामं कोसळू शकतात. सोबतच झाडं आणि वीज पुरवठ्यावर देखील परिणाम होण्याची चिन्हं आहेत. तसेच सखल भागात पाणी साचणे, पूर येणे आणि किनाऱ्यालगत भरतीमुळे उंच लाटा निर्माण होण्याची शक्यता आहे. मुसळधारे पावसाने रस्ते उखडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्याचा परिणाम दळणवळणावर होण्याची शक्यता आहे.
किनारपट्टीवरील सुमारे 21,000 लोकांना मदत शिबिरांमध्ये हलवण्यात आलं आहे. त्यापैकी सुमारे 6,500 लोकांना कच्छ जिल्ह्यातून, 5,000 देवभूमी द्वारकामधून, 4,000 राजकोटमधून, 2,000 मोरबीमधून, 1,500 लोकांना जामनगरमधून, इतर भागातून 550 हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.
Cyclone Warning for Saurashtra & Kutch Coasts: Orange Message. VSCS BIPARJOY at 1730IST of today over NE Arabian Sea near lat 21.3N & long 66.5E, about 290km WSW of Devbhumi Dwarka. To cross near Jakhau Port (Gujarat) by evening of 15th June as VSCS. More: https://t.co/KLRdEFHiFR pic.twitter.com/YqITqfnKQD
— India Meteorological Department (@Indiametdept) June 13, 2023
भारतीय हवामान खात्याच्या (IMD) अंदाजानुसार, चक्रीवादळ बिपरजॉयमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची अपेक्षा आहे आणि गुजरातमधील कच्छ, देवभूमी द्वारका आणि जामनगर जिल्ह्यांना त्याचा सर्वाधिक फटका बसू शकतो. राज्य सरकारने किनारपट्टीपासून 10 किमी परिसरात राहणाऱ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची मोहीम सुरू केली आहे.
ही बातमी वाचा: