Crime News : अरे हा तर लखोबा लोखंडे! एक नाही, दोन नाही, तर तब्बल 27 महिलांशी केलं लग्न; अखेर गजाआड
Crime News : ओदिशा पोलिसांनी एका 66 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. ही व्यक्ती साधीसुधी नाही. या व्यक्तीनं लखोबा लोखंडेलाही मागे टाकलं. या पठ्ठ्यानं तब्बल 27 लग्न केली आहेत.
Crime News : ओदिशा पोलिसांनी 13 फेब्रुवारी रोजी एका 66 वर्षीय व्यक्तीला भुवनेश्वरमधून अटक केली आहे. पोलिसांचं एक विशेष पथक आठ महिन्यांपासून त्याचा पाठलाग करत होतं. एवढंच नाहीतर, या व्यक्तीला पकडण्यासाठी त्याच्या ऑनलाईन व्यवहारांवरही नजर ठेवली जात होती. बिभू प्रकाश स्वेन गाडीतून बाहेर आल्यावर पथकाला धक्काच बसला. हा कोणी डॉन नव्हता, तर एक साधारण उंचीचा माणूस होता. त्याची उंची जेमतेम 5 फूट 2 इंच, तर मोठाल्या मिशा होत्या.
ओदिशा पोलिसांनी राज्यातील सर्वात मोठ्या फसवणूक करणाऱ्याला अटक केली होती. स्वेननं 10 राज्यांतील 27 महिलांशी लग्न केलं. 2006 मध्ये त्यानं केरळमधील 13 बँकांची 128 बनावट क्रेडिट कार्डद्वारे 1 कोटी रुपयांची फसवणूक केली. हैदराबादमध्ये त्यांनी मुलांना एमबीबीएसच्या जागा मिळवून देण्याच्या नावाखाली लोकांची 2 कोटींची फसवणूक केली.
स्वेननं इंडो-तिबेट बॉर्डर पोलिसांच्या सहाय्यक कमांडंटपासून छत्तीसगडमधील चार्टर्ड अकाउंटंट, नवी दिल्लीतील शाळेतील शिक्षिका, आसाममधील तेजपूर येथील डॉक्टर, सर्वोच्च न्यायालय आणि दिल्लीतील दोन वकील अशा महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्याशी लग्न केलं होतं. यासाठी त्यानं Jeevansathi.com, Shaadi.com आणि Bharatmatrimony.com यांसारख्या मॅट्रिमोनिअल साईट्सचा आधार घेतला होता.
वार्षिक उत्पन्न 50-70 लाख रुपये
स्वेननं या साइट्सवर प्रोफेसर बिधू प्रकाश स्वेन असं त्याचं नाव दिलं, जे 51 वर्षांचे आहेत. स्वेननं स्वत:बद्दल लिहिताना त्याचं वार्षिक उत्पन्न 50-70 लाख रुपये असून तो आरोग्य शिक्षण आणि प्रशिक्षणाचे उपमहासंचालक म्हणून कार्यरत असल्याचं लिहिलं. सध्या दक्षिण मध्य विभागात NEET UG आणि PG प्रवेश परीक्षांचे मुख्य नियंत्रक म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचंही त्यानं लिहिलं होतं. सध्या तो योग्य जोडीदाराच्या शोधात असल्याचं त्यानं नमूद केलं होतं.
भुवनेश्वरचे पोलीस उपायुक्त उमाशंकर दास यांनी याबाबत बोलताना सांगितलं की, "स्वेनचं वय प्रत्यक्षात पाहिलं तर 60 पेक्षा अधिक वाटतं. पण अनेक महिलांनी त्याच्या सरकारी नोकरीमुळं त्याच्या वयाकडे दुर्लक्षं केलं. स्वेननं महिलांच्या असहायतेचा पुरेपूर फायदा घेतला आणि मोठा सापळा रचला. त्यानं पीडितेकडून किती पैसे लुबाडले याचा शोध घेणं अद्याप बाकी आहे. प्राथमिक तपासात त्यानं 2-10 लाख रुपये जमा केले असावेत, असं कळतंय. पण पैसे लुबाडण्यासाठीच तो लग्न करण्याचा, हे मात्र स्पष्ट झालं आहे."
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Odisha : पठ्ठ्यानं केलं 7 राज्यातील 14 महिलांशी लग्न ; शेवटच्या बायकोनं पकडलं अन्....
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha